दिवाळीनंतर हेल्मेट सक्ती! राष्ट्रीय महामार्गावरही बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

मार्चपासून सुरु झालेल्या कोरोना संसर्गामुळे ही सक्ती शिथिल केली होती. पण

निपाणी : जानेवारी महिन्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती केली होती. पण मार्चपासून सुरु झालेल्या कोरोना संसर्गामुळे ही सक्ती शिथिल केली होती. आता शहरासह राष्ट्रीय महामार्गावरही हेल्मेटसक्ती दिवाळीनंतर लागू करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. निपाणीत त्याची कडक अमलबजावणी होणार आहे.

सध्या जनतेच्या भावना लक्षात घेता व दिवाळीची गर्दी बघता पोलिस अधीक्षकांनी दिवाळीनंतर सर्वत्र हेल्मेटसक्ती होणार असल्याचे जाहीर केले आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी ६ नोव्हेंबरपासून दुचाकी वाहनचालकांना हेल्मेटसक्ती करण्याचा आदेश जारी केला होता. परंतु या विषयावर वृत्तपत्रे व सोशल मीडियावर नागरिकांनी व्यक्त केलेल्या विरोधाच्या प्रतिक्रियांची पोलिस अधीक्षकांनी दखल घेतली. आता शहरात हेल्मेटसक्तीची अमलबजावणी दिवाळीनंतर केली जाणार आहे.

शहराबाहेरील सर्व राज्यमार्ग व राष्ट्रीयमार्गावर दुचाकी वाहन चालकांना हेल्मेटची सक्ती राहणार आहे. दिवाळीनंतर रहदारी विभागातर्फे प्रमुख रस्त्यावर सिग्नलची व्यवस्था करण्यात येईल का? शहरात वाहन पार्किंगची व्यवस्था होईल का? झेब्रा क्रॉसिंग टाकले जातील का? यासह वाहतुकीसंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच शहरात हेल्मेटसक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा- पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून भैय्या माने यांनी भरला अर्ज -

`दिवाळी खरेदीसाठी शहरात होणारी गर्दी लक्षात घेता हेल्मेटसक्ती करणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे शहरात हेल्मेटसक्ती दिवाळीनंतर केली जाईल. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरही दुचाकीचालकांना हेल्मेट घालणे बंधनकारक राहील. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.'

-संतोष सत्यनायक,मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali festival after Helmet forced in Nipani