ना नकाशा, ना मोजणी! 

Due To The Lockdown, the count Of Agriculture Land Has Stop Kolhapur Marathi News
Due To The Lockdown, the count Of Agriculture Land Has Stop Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : शेताला शेत आणि बांधाला बांध लागला की, त्यासोबत वाद येतोच. मग तो सख्खा भाऊ असो अथवा शेजारी. त्यावर रामबाण उपाय म्हणून वादग्रस्त जमिनीची मोजणी केली जाते; मात्र यंदा मोजणीच्या प्रक्रियेलाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. संचारबंदी, भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरील मर्यादा आदींमुळे नकाशे मिळणे बंद झाले आहे. साहजिकच त्याचा परिणाम जमिनींच्या मोजणी प्रक्रियेवर झाला आहे. विशेष म्हणजे शेती रिकामी असणाराच कालावधी यंदा कोरोनाने वाया घालविला आहे. 

जमिनीच्या मोजणीसाठी शेतीत पीक नसणे अधिक चांगले समजले जाते. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत शेती रिकामी असते. त्यामुळे याच कालावधीत शेतजमिनींची मोजणी अधिक केली जाते. याच कालावधीत कोरोनाचे संकट आले. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले. शासनाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आणल्या. कर्मचारीच नसल्याने शेतजमिनींच्या शासकीय मोजणीची प्रक्रिया रखडली आहे. परिणामी, भावकीतील, शेजाऱ्यांतील वादाचे कारण कायम राहणार आहे. 

सरकलेले बांध गावपातळीवरच समजुतीने सरळ करून घ्यायचे म्हटले तरी त्यासाठी नकाशा आवश्‍यक असतो. संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना नकाशाची मागणी करण्यास जाणे मुश्‍किल झाले. त्यातूनही काही जण कार्यालयापर्यंत पोचले; पण नकाशा देण्याची प्रक्रियाही थांबविल्याचे कार्यालयाकडून त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे गावपातळीवरील ही प्रक्रियाही थंडावली आहे. आता शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत; पण थोड्याच दिवसांत पावसाला सुरवात होणार आहे. या वातावरणात मोजणी करणे अशक्‍य असते. त्यामुळे यंदा कोरोनाने शेतजमिनींची मोजणी प्रकिया वाया घालविली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

वेबसाइटवर नकाशा; पण... 
भूमी अभिलेख विभागातर्फे वेबसाइटवर नकाशे उपलब्ध केले आहेत; मात्र हे नकाशे हे गट नकाशे आहेत. त्यातून गट नंबर, शेजारचे गट नंबर कोण आहेत याची माहिती मिळू शकते. या नकाशांना स्केल नसल्याने मोजणीसाठी ते उपयुक्त ठरत नाहीत. शिवाय या वेबसाइटची आणि त्यावरील नकाशाची माहिती शेतकऱ्यांना फारशी नसल्याचे दिसून येते. 

प्रक्रिया पूर्ववत करण्याचे आदेश
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारेच व्यवहार ठप्प होते. मोजणी प्रक्रिया, नकाशे देण्याची प्रक्रिया थांबविली होती; मात्र 1 जूनपासून मोजणीची प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळालेले आहेत. 
- सिद्धेश्‍वर घुले, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, गडहिंग्लज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com