
कोरोनाच्या संकटामुळे महाविद्यालयांमध्ये ७५ टक्के हजेरी भरणे अवघड जाणार आहे.
बेळगाव : काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने कमी हजेरी असली तरी दहावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी वार्षिक परीक्षेला बसता येईल, अशी माहिती दिली होती. त्यानंतर गुरुवारी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांनाही वार्षिक परीक्षेला बसण्याची संधी मिळणार असल्याची माहिती दिली. कोरोनाच्या संकटामुळे महाविद्यालये विलंबाने सुरु झाली आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी शिक्षण खात्याने सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडून गेले असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाविद्यालयांना सुरवात झाली आहे. तरीही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक वाढलेली नाही. विद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खात्याने लागू केलेल्या विविध नियमांमुळे अनके विद्यार्थी अजूनही महाविद्यालयांमध्ये दाखल झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षण खात्याने . यंदा कमी हजेरी असली तरी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी देण्याचे ठरविले आहे. दहावीसह बारावीतील विद्यार्थ्यांची यंदा कमी हजेरी असली तरी परीक्षेला बसता येणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या निर्णयाचा लाभ होणार आहे.
बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी किमान ७५ टक्क्यांपेक्षा अधिक असली तरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते. त्यामुळे कमी हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे दरवर्षी कमी हजेरी असल्याने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येत नाही. परंतु यावेळी कोरोनाच्या संकटामुळे महाविद्यालयांमध्ये ७५ टक्के हजेरी भरणे अवघड जाणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे..
संपादन- अर्चना बनगे