1 जूनपासून कर्नाटक राज्यात 'या' 8 रेल्वे धावणार...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

रेल्वे खात्याची माहिती : बेळगाव मार्गे दोन रेल्वे धावणार

बेळगाव - 1 जूनपासून देशभरात 200 तर कर्नाटकात 8 रेल्वे रुळावर येणार आहेत. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून नुकताच देण्यात आली आहे. कर्नाटकात धावणाऱ्या 8 रेल्वे गाड्यांपैकी दोन रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकावरून धावणार आहेत. यामुळे बेळगावातील प्रवाशांनाही याचा लाभ होणार आहे.

पार्सल रेल्वे वाहतूक वगळता देशातील प्रवासी वाहतूक 22 मार्चपासून बंदच असल्याने रेल्वेचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. चक्क दोन महिन्यांनी 22 मेपासून प्रवासी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने 1 जूनपासून द्वितीय श्रेणीची प्रवासी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या रल्वेगाड्यांसाठी तिकीट आरक्षणही सुरु झाले आहे.

वाचा - शब्बास ! मुस्लिम बांधवांनो... तुमचं हे योगदान अतुलनीयच...

राज्यभरात 1 जूनपासून हुबळी ते बंगळूर- जनशताब्दी एक्‍सप्रेस, गदग ते मुंबई, गदग ते बंगळूर, यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन, वास्को दगामा ते हजरत निजामुद्दीन, बंगळूर ते दानापूर, हावडा ते यशवंपूर, यशवंतूर ते शिवमोगा एक्‍सप्रेस सुरु करण्यात येणार आहेत. यातील वास्को दगामा ते हजरत निजामुद्दीन व यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन या रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकावरून धावणार आहेत. यामुळे दिल्लीला जाण्यासाठी प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. 22 मे पासून बेळगाव ते बंगळूर व बंगळूर ते म्हैसूर या दोन रेल्वे सुरु आहेत. यामुळे राज्यात 1 जूनपासून धावणाऱ्या रेल्वे गाड्याची संख्या दहा होणार आहे. अधिक माहितीसाठी रेल्वे स्थानकाशी संपर्क साधावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्यातील काही ठरावीक रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटर सुरु करण्यात आली आहेत. प्रवाशांना ऑनलाईनबरोबर त्या काऊंटरवरून देखील तिकीट बुकींग करता येणार आहे. स्थानक परिसरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी केली जात आहे. या तपासणीकरीता काही वेळ आगोदर रेल्वे स्थानकावर पोहचणे आवश्‍यक आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणेही अनिवार्य आहे.

बेळगाववरून धावणारी रेल्वे

यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर ही द्वी साप्ताहिक संपर्क क्रांती स्पेशल रेल्वेगाडी मंगळवारपासून (ता.2) सुरु होणार आहे. दर मंगळवारी आणि गुरुवारी यशवंतपूर येथून तर शुक्रवार (ता.5) पासून बुधवारी व शुक्रवारी निजामुद्दीन येथून सुरु होणार आहे.

1 जूनपासून कर्नाटक राज्यात 8 रेल्वे धावणार आहेत. यापूर्वी 2 रेल्वे सुरु आहेत. प्रवाशांनी तिकीट काऊंटरवर किंवा ऑनलाईन बुकींग करावे. प्रत्येकाने मास्क वापरणे व आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे बंधनकारक असणार आहे.
- प्राणेश, जनसंपर्क अधिकारी, नैर्ऋत्य रेल्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight trains will run in Karnataka from first june