आजरा तालुक्‍यात 'इतक्या' गावांत यंदा "एक गाव एक गणपती'चा नारा 

रणजित कालेकर
Saturday, 25 July 2020

आजरा तालुक्‍यात 110 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी मंडळे पारंपरिक पद्धतीने, मोठ्या भक्तीभावाने उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात.

आजरा  : आजरा तालुक्‍यात "एक गाव एक गणपती' या संकल्पनेला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्‍यातील 47 गावांतील गणेशोत्सव मंडळांनी एकत्रित येऊन एकच सार्वजनिक गणपतीचे पूजन करण्याचे यंदा ठरवले आहे. पोलिस प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर सर्वांचा भर राहणार आहे. 

आजरा तालुक्‍यात 110 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. दरवर्षी मंडळे पारंपरिक पद्धतीने, मोठ्या भक्तीभावाने उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, पण यंदा याला फाटा देण्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे.

कोरोनासारख्या जागतिक महामारी विरोधात लढा देताना उत्सव साजरा करण्यात अनंत अडचणी आहेत. या उत्सवावरील येणारा खर्च पाहता यंदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा सर्वांचा कल आहे. आजरा शहरातून सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी याची सुरवात केली. या कल्पना तालुक्‍यातील अनेक गावांनी उचलून धरली आहे. तालुक्‍यातील 47 गावांनी ही संकल्पना उचलून धरली आहे. 

या गावांत निर्णय 
आजरा, कर्पेवाडी, सोहाळे, हरपवडे, मुमेवाडी, दर्डेवाडी, वडकशिवाले, शिरसंगी, चिमणे, हांदेवाडी, कोवाडे, चांदेवाडी, सुलगाव, हाळोली, जेऊर, लाकूडवाडी, सरोळी, महागोंड, देवर्डे, पेंढारवाडी, सुळे, भादवण, हाजगोळी बुद्रुक, पेद्रेवाडी, जाधेवाडी, महागोंडवाडी, विनायकवाडी, वेळवट्टी, वाटंगी, मासेवाडी, हालेवाडी, गवसे, खेडगे, खोराटवाडी, मुंगुसवाडी, दाभिल, मेढेवाडी, झुलपेवाडी, देऊळवाडी, सातेवाडी, निंगुडगे, इटे, सरंबळवाडी, पारेवाडी, कानोली, आरदाळ, वझरे या गावात एक गाव एक गणपती साजरा करण्याचे ठरले आहे. 

चळवळीचे स्वरूप 
1997-98 मध्ये तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख माधवराव सानप यांनी "एक गाव एक गणपती' संकल्पना सुरू केली. जिल्ह्यासह आजरा तालुक्‍यात याला चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यातील अनेक गावात एक गाव एक गणपती साजरा होत होता. आता ही संकल्पना चळवळ बनत आहे. 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Ek Gaon Ek Ganpati" In 47 Villages In Ajra Taluka This Year Kolhapur Marathi News