म्हणुन... या तरुणीने दिला आपला पहिला पगार वृद्धाश्रमास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The engineer girl paid her first salary to the old age home

नोकरीचा पहिला महिना संपत आला आणि आता तिला प्रतीक्षा होती, हाती पडणाऱ्या पहिल्या पगाराची. सहाजिकच सगळ्याचा सगळा पगार तिने स्वतःसाठी खर्च केला असता तरी कोणाची हरकत नव्हती. पण पूजाची जडणघडणच वेगळी.

म्हणुन... या तरुणीने दिला आपला पहिला पगार वृद्धाश्रमास...

कोल्हापूर - सरकारी नोकरी आणि नोकरीतला पहिला पगार म्हणजे काय करू आणि काय नको, असेच वाटण्यासारखा क्षण. पहिल्या पगारातून कोणी कपडे, कोणी दागिने, हायफाय मोबाईल घेण्याचे ठरवते. अर्थात त्यात काही तसे गैरही नाही; पण पूजा पाटील या इंजिनिअर तरुणीने आपल्या पहिल्या पगाराची रक्कम आज मातोश्री वृद्धाश्रमाला दिली आणि पगाराची शान आणखीनच वाढवली.

नोकरीचा पहिला महिना संपत आला आणि...

पूजा कुशाबा पाटील ही आष्टा (ता. वाळवा) गावची. घरची स्थिती सर्वसाधारण. वडील मुंबईत एका खासगी कंपनीत मजुरीला आणि आई घरकामात. पण पूजा आपल्या 
राहणीमानाचे भांडवल करत रडत बसली नाही. तासगावच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निकमध्ये तिने डिप्लोमा केला. पुढे सार्वजनिक बांधकाम खात्याची तिने परीक्षा दिली. व कनिष्ठ अभियंता म्हणून तिची निवड झाली. तिची पहिली नियुक्ती ती गेल्या महिन्यात जालना येथे झाली. नोकरीचा पहिला महिना संपत आला आणि आता तिला प्रतीक्षा होती, हाती पडणाऱ्या पहिल्या पगाराची. सहाजिकच सगळ्याचा सगळा पगार तिने स्वतःसाठी खर्च केला असता तरी कोणाची हरकत नव्हती. पण पूजाची जडणघडणच वेगळी. ती एकदा तिच्या मैत्रीणी समवेत आर के नगर येथील शिवाजीराव पाटोळे यांच्या मातोश्री वृद्धाश्रमात आली होती. वृद्धाश्रमातील वृद्धांची मानसिकता, त्यांची अवस्था व त्यांच्यासाठी पाटोळे परिवाराने दिलेला आधार पाहून ती त्यावेळी गलबलून गेली होती. पण तिचे शिक्षण सुरू होते. तिला तिच्या खर्चासाठी कसेबसे पैसे मिळत होते. त्यामुळे ती या वृद्धांसाठी त्या क्षणी काही करू शकत नव्हती मात्र ही सल तिच्या मनातून अद्यापही गेली नव्हती. आता तिला नोकरी  लागली. पहिला पगारही हाती आला. सलग दोन तीन दिवसाची सुट्टी मिळाली. आणि पूजा पाटील आज कोल्हापुरात आली. पर्समध्ये पहिल्या पगाराची सगळी रक्कम होती. ती थेट मातोश्री वृद्धाश्रमात गेली व आपला पहिला पगार या आजी-आजोबांसाठी घ्या अशी तिने विनंती केली.

वाचा - थरारक... मगरींच्या हल्लातुन बैलाने वाचले आपल्या धन्याचे प्राण...

पाटोळे परिवार या आगळ्यावेगळ्या विचाराच्या तरुणीकडे पाहतच राहिला. पण पूजा पाटील ने शांतपणे आपला पगार शिवाजीराव पाटोळे यांच्याकडे सुपूर्त केला. आणि टाळ्या नाही, भाषणबाजी नाही. काही क्षणासाठी मातोश्री वृद्धाश्रमाचा सगळा हॉल स्तब्ध झाला. यावेळी वृद्धाश्रमाचे शरद पाटोळे रोहन पाटोळे उपस्थित होते

माझा पगार आयुष्यभर मला मिळत राहील, पण पहिला पगार थेट गरजूंच्या हातात पडावा, या हेतूने मी वृद्धाश्रमाला दिला. अर्थात माझ्या या एका पगाराने वृद्धांच्या सर्व समस्या सुटतील, असे अजिबात नाही. पण जेवढे मला माझ्या कुवतीनुसार करता येईल, तेवढे मी केले आहे. हा काही फार मोठा त्याग नक्कीच नाही.
- पूजा कुशाबा पाटील.