पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी भरीव तरतूद करावी 

युवराज पाटील
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : राज्यातील वीस प्रदूषित शहरांमध्ये समावेश झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी महापालिकेने 2020-21 च्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच पंचवीस टक्के निधी पर्यावरणासाठी राखीव ठेवावा. शहराचा भौगोलिक विस्तार कमी असला, तरी वाढते वायू आणि धुळीचे प्रदूषण जीवघेणे ठरू लागले आहे. 

कोल्हापूर : राज्यातील वीस प्रदूषित शहरांमध्ये समावेश झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी महापालिकेने 2020-21 च्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच पंचवीस टक्के निधी पर्यावरणासाठी राखीव ठेवावा. शहराचा भौगोलिक विस्तार कमी असला, तरी वाढते वायू आणि धुळीचे प्रदूषण जीवघेणे ठरू लागले आहे. 

मुंबई, नवी मुंबईच्या यादीत प्रदूषित शहर म्हणून कोल्हापूरचा समावेश झाला आहे. अरूंद रस्ते, रस्त्यांची धूळधाण त्यातून उडणारी धूळ, वाहनांतून निघणारा धूर यामुळे सकाळी दहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी पाच ते आठ यावेळेत शहराची कोंडी होते. पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्‍न हळूहळू निकालात निघू लागला आहे, ही एक समाधानाची बाब आहे. 96 पैकी 91 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार असे नाले अडविण्यात यश आले आहे. वीटभट्टी, लक्षतीर्थ वसाहत. रमणमळा वॉटर पार्क येथील नाले अडविणे बाकी आहे. उपनगरात अमृत योजनेतून ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. उपनगरातील सांडपाणी दुधाळी एसटीपीत येऊन तेथे प्रक्रिया होईल. 

शहराच्या ई वॉर्डात अजूनही ड्रेनेजलाईन नाही. त्यामुळे सांडपाणी निर्गतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. पंचगंगा तसेच रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना झाल्या आहेत. त्यावर हरित लवाद समाधानी आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सायलेंट झोन करण्यात आले. त्यांचे अस्तित्व कागदोपत्री राहिले आहे. रंकाळा तसेच कळंबा तलाव परिसरातील पक्षी संवर्धनाकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. 

धूर तसेच वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. शहरात दररोज पाच ते सहा लाख वाहने रस्त्यावर धावतात. त्यातून होणाऱ्या वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून, धुळीमुळे शहर माखले आहे. अमृत योजनेतून ड्रनेज व पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या धुळीचा प्रश्‍न गंभीर आहे. महापालिकेला दरवर्षी विशिष्ट निधी पर्यावरण संवर्धनासाठी राखून ठेवावा लागतो. यावर्षीही त्याकामी ठोस तरतूद करून जैवविविधता त्यात प्रामुख्याने तलाव, ओढे, उद्याने अधिक सक्षम कशी केली जातील, याकडेही लक्ष द्यायला हवे, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. 

पक्षी वाचवा' अभियान राबवणे महत्त्वाचे आहे. 2019 च्या महापुराने आपली ताकद दाखवून दिली. झाडावरील पक्ष्यांची घरे पुरामुळे कुजली. अंडी वाहून गेली. पिले वाहून गेली. अनेक प्रकारे पक्षी बेघर झाले. त्यामुळे पक्ष्यांसाठी आता काम करायला हवे. शहरात पक्ष्यांसाठी "एक घर' संकल्पना राबवूया. "आमचे शहर आमचे बजेट'मध्ये त्यासाठी ठोस कार्यक्रम असावा. 
- रामचंद्र ज्ञानदेव पाटील, वाकरे 

महापालिकेच्या वतीने प्रदूषण रोखण्याच्या योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच हरित लवादाने पंचगंगा व रंकाळा प्रदूषणमुक्तीबाबत समाधान व्यक्त करून याबाबतची याचिका निकालात काढली आहे. येत्या बजेटमध्ये ठोस तरतूद केली जावी. 
- आर. के. पाटील, अभियंता, महापालिका 

विविध तलावांतील जैवविविधता हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. रंकाळा, कळंबा तसेच लगतच्या तलावांचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे. महापालिकेने या बजेटमध्ये त्यादृष्टीने पावले उचलावीत. 
- अमर जाधव, मासा विक्रेते 

पर्यावरणाच्या उपाययोजना करताना जनजागृती करणे गरजेचे आहे. पदयात्रा, डिजिटल फलक यातून प्रबोधन व्हावे. वाढती लोकसंख्या व प्रदूषणामुळे मानवी जीवनाल धोका आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागृकतेने कार्यरत राहणे गरजेचे आहे. व्यक्तीगत आचारविचारात पर्यावरणाची ओढ असावी. वृक्षारोपण जास्तीत करावे. त्याचबरोबर झाडे जगविली पाहिजेत. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. 
- के. एम. बागवान. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Enough provision should be made to prevent environmental degradation