esakal | चार वर्षे लोटली तरी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी जागाच निश्चित नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

Even after four years, there is no definite place for the statue of Rajarshi Shahu Maharaj in belgum

बेळगावातील विविध दलित संघटनांनी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली. त्यानंतर माजी मंत्री व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी यासाठी पुढाकार घेतला.

चार वर्षे लोटली तरी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी जागाच निश्चित नाही...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा बेळगाव शहरात उभारण्याचा निर्णय होवून चार वर्षे लोटली. पण चार वर्षात पुतळ्यासाठी महापालिका प्रशासनाला जागा मिळालेली नाही. बेळगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ पुतळा उभारण्याचा निर्णय सरीता पाटील महापौर असताना 2016 साली महापालिकेत झाला होता. महामार्गावरून बेळगाव शहरात प्रवेश करताना राजर्षी शाहू महारांना नमन करण्याची संधी बेळगावकरांना मिळावी हा त्या मागील उद्देश होता. बेळगावातील विविध दलित संघटनांनी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली. त्यानंतर माजी मंत्री व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी यासाठी पुढाकार घेतला. बसप्पा चिक्कलदिन्नी बेळगावचे महापौर असताना सतीश जारकीहोळी यांच्याच अध्यक्षतेखाली यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यात सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांचाही समावेश होता. पण महापालिकेतील लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपला व पुतळा उभारणीचा विषय मागे पडला.

वाचा - यंदाचा शाहू पुरस्कार जाहीर होणार : जिल्हाधिकारी दौलत देसाई

भगवान बुद्ध यांचा पुतळा बेळगाव शहरातील किल्ला तलावात उभारण्याचा निर्णय आधीच झाला आहे. त्यासाठी शंभर कोटी रूपये राखीव अनुदानातील रक्कमही बाजूला काढून ठेवण्यात आली आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्यासाठी आमदार जारकीहोळी यांनी निधी देण्याचे मान्य केले होते. पण नंतर पुतळ्याच्या जागेवरून समस्या उद्भवली. महामार्गालगत राष्ट्रपुरूषांचे पुतळे उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंद घातल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे मग बुडा कार्यालयानजीक जेथे सर्वात उंच राष्ट्रध्वज आहे, तेथेच गौतम बुद्ध व शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पण बेळगावातील दलित संघटनानी त्याला विरोध केला. गौतम बुद्ध यांचा पुतळा किल्ला तलावातील बेटावर उभारला जावा तर शाहू महाराजांचा पुतळा श्रीनगर येथील उद्यानात उभारला जावा अशी लेखी मागणी संघटनानी केली. अजूनही पुतळ्याची जागा निश्‍चित झालेली नाही. शाहू महाराजांची जयंती 26 जून रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या पुतळ्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पाहा - व्हिडीओ : देशातील सर्वात उंच हा राष्ट्रध्वज अखेर फडकला....

बेळगाव महापालिकेच्या मुख्य सभागृहात शाहू महाराजांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यावेळी सत्ताधारी व विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येवून छायाचित्र लावण्याचा निर्णय घेतला. 2016 साली शाहू जयंतीच्या दिवशीच सभागृहात छायाचित्र लावण्यात आले. शाहू महाराजांचा पुतळा शहरात उभारला गेला पाहिजे यासाठी दलित संघटना आग्रही आहेत. पण पुतळा कोठे उभारावा याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीतच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता महापालिकेत लोकनियुक्त सभागृह आल्यानंतरच हा विषय मार्गी लागणार आहे.

राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा श्रीनगर येथील उद्यानात उभारण्याचा प्रस्ताव दलित संघटनांच्या वतीने महापालिकेला देण्यात आला आहे. त्याबाबत महापालिकेकडून निर्णय होणे आवश्‍यक आहे.

- अर्जुन देमट्टी, माजी अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळ