स्फोटाने शिमोगा हादरले; जिलेटिन कांड्यांचा स्फोट: ७ ठार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

हादरे चार जिल्ह्यांतील गावांत, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

बंगळूर : शिमोगा शहरापासून जवळच असलेल्या हुनसोडू गावाशेजारी स्टोन क्रशरवर जिलेटिनच्या कांड्यांमुळे गुरुवारी रात्री ११ वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात सात मजूर ठार झाले असून परिसरातील घरांसह इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दुर्घटनेची उच्चपातळीवर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिले आहेत. 

स्फोटाची तीव्रता इतकी होती की, शिमोगा, चिक्कमंगळूर, उत्तर कन्नड आणि दावणगेरे जिल्ह्यातील काही भागात जमीन हादरली. त्यामुळे लोकांना भूकंप झाल्याचा भास झाला व ते  घाबरून घराबाहेर पडले. शिमोगा शहरातील इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अब्बालगेरेकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याचे शिमोगा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी पाच जण कर्नाटकातील असून एक जण बिहारचा आहे. स्फोटात ट्रक व जवळच असलेले वाहन जळून खाक झाले.यासंबंधी क्रशर मालक सुधाकर याच्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस स्फोटाच्या नेमक्‍या कारणाचा शोध घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्या ते घटनास्थळाला भेट देणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि खाण व भूविज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शहराबाहेरील भागात उत्खननाच्या ठिकाणी ट्रकमधून आणलेल्या डायनामाइट व जिलेटिनच्या कांड्यांतून उच्च तीव्रतेचा स्फोट झाला. एका ट्रकमध्ये ५० हून अधिक डायनामाइट बॉक्‍स व जिलेटिनच्या कांड्या आणल्या होत्या. त्यांचा एकत्रित स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोटामुळे हुनसोडू आणि लगतच्या खेड्यांत धुराचे लोट उसळले होते. त्यामुळे लोकांना धुराच्या त्रासामुळे गुदमरल्यासारखे झाले. स्फोटाची तीव्रता इतकी होती, की संपूर्ण ट्रक जळून खाक झाला व सहा मजूर छिन्नविच्छिन्न अवस्थेत जागीच मृत्युमुखी पडले. अन्य काही जण जखमी झाले आहेत. सकाळपर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आणखी दोन मृतदेह सापडले. परंतु, सायंकाळी गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारपर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती.

चित्रदुर्ग व दावणगेरे येथील एएससी विशेष पथक व श्वान पथकाने घटनास्थळाला भेट देऊन शोध घेतला. बंगळूर व मंगळूर येथून बाँब निष्क्रिय पथकाचेही आगमन झाले. त्यांनी सायंकाळपर्यंत स्फोट झालेल्या ठिकाणाची पाहणी केली व स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावर जाण्यास लोकांना निर्बंध घालण्यात आले आहेत.

गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, ‘‘दगड उत्खनन क्षेत्राचा मालक आणि डायनामाइट पुरवठा करणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी सामील झालेल्यांना अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू असून जिल्हा पोलिस आणि जिल्हा प्रशासन बचावासाठी काम करत आहे. ताज्या अहवालानुसार ७ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे संपूर्ण चित्र मिळविण्यासाठी थोडा वेळ लागेल. ही घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्याच्या संपूर्ण तपासणीनंतर अधिक माहिती मिळविली जाईल.’’ 

शिमोगा येथे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना. राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

कर्नाटकात दगड खाण उत्खननात स्फोट झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती. अशा घटनांच्या सखोल चौकशीची गरज आहे. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येतील.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते

स्फोटाच्या घटनेनंतर काल रात्रीपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. बचावकार्यासाठी पथक पाठवले. शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींचे आरोग्य लवकर सुधारावे यासाठी मी प्रार्थना करतो.
- बी. एस. येडियुराप्पा, मुख्यमंत्री

संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The explosion shook Shimoga Explosion of gelatin sticks 7 killed belguam news marathi news