निव्वळ पांढऱ्या तांबड्यासाठी 55 लाखांची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

जिल्ह्यात अजूनही काही गावांत जत्रा यात्रा भरतात. पै-पाहुण्यांना निमंत्रण दिले जाते. गोड़्याबरोबर खाऱ्याचाही बेत केला जाताे

निव्वळ यात्रांसाठी बकऱ्यांची उलाढाल 55 लाख रुपयांची 

सेनापती कापशी (कोल्हापूर) : चिकोत्रा खोऱ्यातील ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू होत त्या पार्श्वभूमीवर आज पहिला आठवडी बाजार झाला. यामध्ये निव्वळ मेंढरांचा (बकरी) 55 लाखांची उलाढाल झाली. परिसरातील 20 गावातील यात्रांचा हंगाम दोन महिने चालतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात प्रत्येक बाजारातील उलाढाल सुमारे 50 लाखाने वाढते.

प्रत्येक सोमवारी भाजीपाला, मसाले, तेल, कडधान्ये आणि इतर असा सुमारे 20 लाख रुपयांचा व्यापार होत असतो. येथे बाजारात ग्रामपंचायत पावती घेऊन लहान सहान व्यापार करणारे 300 विक्रेते असतात. नेहमीचे व्यापारी, दुकानदार यांचा व्यापार आठवडाभर सुरूच असतो. 20 गावांसाठी ही आठवडी बाजारपेठ असल्याने व्यापारी आणि भाजीपाला, फळ विक्रेते शेतकरी देखील यामध्ये असतात. परिसरातील ग्रामदेवतेच्या यात्रा या मांसाहारी असल्याने या दोन महिन्यांच्या काळात मांसासाठी मेंढरे आणि बोकड आणि त्याच्यासाठी लागणारे, तेल, मसाले आणि इतर बाजारात मोठी वाढ होते. यात्रा काळ सुरू आल्यावर हा पहिलाच आठवडी बाजार होता. येथील प्राथमिक शाळा इमारतीपासून जुन्या एसटी स्टँड पर्यंत बकऱ्यांचे विक्रेते आणि ग्राहक यांची प्रचंड गर्दी झाली होती. येथे केवळ मेंढरांचा 55 लाखांची उलाढाल झाली. साडे सहाशे विक्रेते आज आले होते.

सीमेवरून आले विक्रेते

भुदरगड तालुक्यातील नांगरगाव पासून आजरा आणि कागल तालुक्यातील सीमेवरील गावातून विक्रेते आले होते. गेले वर्षीपेक्षा यावर्षी पिके चांगली आहेत. कर्जमाफीची शक्यता यामुळे लोकांच्यात यात्रांचा उत्साह आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty five lakh turnover in weekly market kolhapur marathi news