गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दल-राष्ट्रवादी आमने-सामने

अजित माद्याळे
Tuesday, 13 October 2020

गतवर्षी हद्दवाढीच्या निवडणुकीत गळ्यात गळे घातलेल्या जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या (ता. 13) उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

गडहिंग्लज : गतवर्षी हद्दवाढीच्या निवडणुकीत गळ्यात गळे घातलेल्या जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या (ता. 13) उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने आमने-सामने उभे ठाकणार आहेत. चार वर्षांत एकदाही उपनगराध्यक्ष अथवा समिती सभापती निवडीत भाग न घेतलेल्या राष्ट्रवादीने उद्याच्या निवडणुकीत मात्र अर्ज दाखल करण्याचा निर्धार केला आहे, परंतु त्यांना पहिल्यांदा संख्याबळाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 

जनता दलाकडे नगराध्यक्ष स्वाती कोरी यांच्यासह 12 तर राष्ट्रवादीकडे 5 नगरसेवकांचे बलाबल आहे. भाजपचे दोन, तर शिवसेनेचे एक नगरसेवक आहे. भाजपच्या दौनपैकी शशिकला पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी जनता दलात प्रवेश केला आहे. यामुळे जनता दलाची सभागृहातील संख्या 13 वर जाते. उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्याने या पदावर कोणाला संधी मिळणार याची चर्चा होती.

वाढीव हद्दीच्या प्रभागातून निवडून आलेले जनता दलाचे महेश कोरी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे. उपनगराध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होताच राष्ट्रवादीने बैठक घेऊन ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रामगोंडा ऊर्फ गुंड्या पाटील यांच्या पत्नी नगरसेविका सौ. सावित्री पाटील यांच्यासह रूपाली परीट यांची उमेदवारी दाखल करणार असल्याचे समजते. त्यातून पाटील यांना रिंगणात उतरवणार असल्याचेही खात्रीशीर वृत्त आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी उपनगराध्यक्षाची निवडणूक लढविणार असली तरी त्यांच्यासमोर संख्याबळाचे आव्हान उभे आहे. त्यांच्याकडे पाच नगरसेवक आहेत. जनता दलाकडे नगराध्यक्षसह 13 सदस्य आहेत. या दोन्ही पक्षांतील बलाबलमध्ये मोठा फरक आहे.

परिणामी या संख्याबळाचे मोठे आव्हान राष्ट्रवादी पार करणार का, हा प्रश्‍न आहे. उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने दोन्ही पारंपरिक विरोधी पक्ष अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आमने-सामने येणार असून, या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting Between Gadhinglaj Municipal Janata Dal-NCP Kolhapur Marathi News