आजऱ्यात पहिलीची प्रवेश प्रक्रिया कूर्मगतीने

रणजित कालेकर
शनिवार, 23 मे 2020

प्राथमिक शिक्षणाचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे पहिलीचा प्रवेश होय. सध्या कोरोनामुळे पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया शासनाने ऑनलाईन केली आहे. ग्रामीण भागातील पालक ऑनलाईन प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्यामुळेही प्रक्रिया आजरा तालुक्‍यात संथगतीने सुरू आहे. या दहा दिवसांत अवघ्या 145 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 

आजरा : प्राथमिक शिक्षणाचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे पहिलीचा प्रवेश होय. सध्या कोरोनामुळे पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया शासनाने ऑनलाईन केली आहे. ग्रामीण भागातील पालक ऑनलाईन प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्यामुळेही प्रक्रिया आजरा तालुक्‍यात संथगतीने सुरू आहे. या दहा दिवसांत अवघ्या 145 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 

गुढी पाडवा आणि प्रवेश वाढवा हे समीकरण गेले अनेक वर्षे जिल्ह्यात राबविले जात आहे. मात्र यंदा गुढी पाडव्याच्या तोंडावरच कोरोनाने प्रवेश केल्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबत गेली. अखेर नियमावलीच्या अधीन शासनाने प्रथमच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत शाळांना कळविले. ऑनलाईन अर्ज देखील उपलब्ध करून दिले आहेत.

तालुक्‍यात 121 प्राथमिक शाळामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली, पण या प्रक्रियेबाबत पालकांना पुरेशी माहिती नसल्याने पालकांनी या प्रक्रियेबाबत तितकी उत्सुकता दाखवलेली नाही. या दहा दिवसांच्या काळात फक्त 145 बालकांचे प्रवेश नोंद झाले आहे. शिक्षण विभागाच्या सर्वेक्षण व एकात्मिक बालविकास यांच्या नोंदीनुसार सुमारे 800 बालके तालुक्‍यात प्रवेशास पात्र आहेत.

शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याबाबत निश्‍चितता नसली तरी शिक्षण विभाग पुढील शैक्षणिक वर्षाची आपली तयारी सुरू ठेवली आहे. प्रवेश प्रक्रियेला गती येण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी संबधित पालकांना भेटून त्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत यासाठी शिक्षण विभागाने सूचना दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या काही दिवसात प्रवेश नोंदणी गती येण्याची शक्‍यता आहे. 

सर्वेक्षण, क्वारंटाईन ड्यूटीचा परिणाम 
प्राथमिक शिक्षकांना कोरोनाचा सर्वेक्षण व तसेच क्वारंटाईनची ड्यूटी शासनाने सोपवली आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक कामांकडे वेळ देणे अडचणीचे झाले आहे. परिणामही शैक्षणिक कामे व प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first Standerd Admission Process In Ajara Very Slow Kolhapur Marathi News