esakal | "या' प्रकल्पामुळे आजरा, गडहिंग्लजमध्ये येतोय पूर...,पण वास्तव काय आहे...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Flooding Due To Chitri Project..? But What Is Reality Kolhapur Marathi News

चित्री प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते, अशी चर्चा पूरबाधित गावात दरवर्षी ऐकावयास मिळत आहे. गतवर्षी तयार झालेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे या चर्चेत भर पडली.

"या' प्रकल्पामुळे आजरा, गडहिंग्लजमध्ये येतोय पूर...,पण वास्तव काय आहे...वाचा सविस्तर

sakal_logo
By
रणजित कालेकर

आजरा : चित्री प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते, अशी चर्चा पूरबाधित गावात दरवर्षी ऐकावयास मिळत आहे. गतवर्षी तयार झालेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे या चर्चेत भर पडली. यंदाही तीन वेळा पूर आल्याने पूरबाधित गावात चर्चेला ऊत आला आहे, तर दुसरीकडे आंबोली परिसर, आजरा तालुक्‍याचा पश्‍चिम भाग, आजरा व गडहिंग्लज पूर्व व दक्षिण भागातील मुक्त पाणलोटातून येणाऱ्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचा आकडेवारीवरून तज्ज्ञ हवाला देत असतात, पण आजरा व गडहिंग्लजमध्ये तयार होणाऱ्या पूर परिस्थितीचा वस्तुस्थिती तपासण्याची व त्यादृष्टीने अभ्यास होण्याची गरज आहे. 

गतवर्षी अतिवृष्टीच्या काळात आजरा गडहिंग्लज तालुक्‍यात महापूर आला होता. दोन्ही तालुक्‍यांतील अनेक गावे पुरामुळे बाधित झाली होती. घरांची पडझड, पीक, शेती व जनावरे वाहून जाण्याबरोबर रस्ते व मोऱ्यांही खचल्याने मोठी वित्तहानी झाली होती. हे भीतीदायक चित्र पावसाळ्यात अनेकांना घाम फोडणारे आहे.

पूर येण्याची अनेक कारणे असली तरी चित्रीमुळे पूरपरिस्थिती तयार होत असल्याची चर्चा पूरबाधित गावात ऐकण्यास मिळाली. यंदाही दोन वेळा पूर आल्यामुळे याबाबत चर्चेला ऊत आला आहे. दरवर्षीप्रमाणे संकेश्‍वर (कर्नाटक) परिसरात ही चर्चा सुरू आहे, पण यातील वास्तव समजावून घेण्यासाठी पुराबाबत अभ्यास होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यातूनच वस्तूस्थितीचा उलघडा होणार आहे. 

चित्री भरण्यापूर्वी दोन वेळा पूर 
यंदा चित्री धरण 13 ऑगस्टला भरले, पण हे धरण भरण्यापूर्वी जुलै महिन्यात व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर आला. त्यामुळे त्या पुराशी चित्रीचा संबंध नसल्याचे स्पष्ट आहे. 


गतवर्षीच्या महापुरात चित्रीतून केवळ 7 टक्के पाणी 
गतवर्षी 25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 ला चित्री धरण स्थळावर केवळ 17 दिवसांत 2 हजार 502 मिलिमीटर पाऊस झाला होता. 6 ऑगस्ट या दिवशी चोवीस तासांत 322 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी जलविज्ञान उपविभागाने कडाल येथे हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहातून होणाऱ्या विसर्ग मोजला होता. 9 ऑगस्ट हिरण्यकेशीचा 31 हजार 111 क्‍युसेक हा विसर्ग सर्वात जास्त होता. 8 ऑगस्ट - 29 हजार 545 होता याच दिवशी चित्रीतून 5 हजार 333 कयुसेक इतका विसर्ग होता. यामध्ये केवळ सात टक्के पाणी हे चित्रीतून, तर मुक्त पाणलोट क्षेत्रातून 93 टक्के पाणी वाहिले हे स्पष्ट झाले आहे. 

दृष्टिक्षेपात 
- चित्री परिसरात 15 ते 18 ऑगस्ट या काळात अनुक्रमे पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा, (ता.15) - 55 (ता.16)-85, (ता.17)- 152, (ता.18) -90. या काळात चित्रीतून व सुरू असलेला विसर्ग 2005 क्‍युसेक होता. 
- जलविज्ञान केंद्र कडाल (ता. गडहिंग्लज) येथे 16 ते 18 ऑगस्ट या तीन दिवसांत मोजलेला हिरण्यकेशी नदीचा विसर्ग (क्‍युसेक) असा, (ता. 16) 12 हजार 829, (ता.17) 20 हजार 784, (ता. 18) 23 हजार 11. यामध्ये चित्रीचा विसर्ग हा केवळ 2 हजार असून, उर्वरित सर्व पाणी मुक्त पाणलोटमधून आल्याचे स्पष्ट होते.

संपादन - सचिन चराटी