मलकापूर आगाराचा पाय खोलात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

कोरोनाने अनेकांना घरी बसवले. रोजगार गेला. आता एसटी महामंडळाच्या मलकापूर आगाराचेही महिनाभरात उत्पन्न बुडाले....

भेडसगाव : जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या एस.टी. बसेस बंद केल्या आहेत. लॉकडाऊनमुळे "लाल परी' जाग्यावरच थांबल्याने याचा फटका मलकापूर (ता. शाहूवाडी) आगाराला बसला असून, गत 36 दिवसांत सुमारे 1.35 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण मार्च महिन्यात वाढत असल्याचे पाहून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शाळा-महाविद्यालये बंद केल्याचे पाहून 20 मार्च रोजी राज्य परिवहन विभागाने सर्वत्र फेऱ्या कमी करण्यास सुरुवात केली. मलकापूर आगारानेही 20 मार्च रोजी काही फेऱ्या रद्द केल्या. तसेच ज्या फेऱ्या सुरू होत्या, त्यासाठी खबरदारी म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये धूर आणि औषध फवारणी केली. चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायजरचे वाटप केले.

21 मार्चनंतर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून दररोज बंद होणाऱ्या फेऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत गेले. अखेर 22 मार्चपासून एस.टी.च्या सर्व गाड्या अखेर बंद करण्यात आल्या. मलकापूर आगाराच्या बसेस दररोज 13 हजार किलोमीटरचे अंतर कापतात. यातून सरासरी 4.50 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळते. यामुळे लॉकडाऊन दरम्यान आजअखेर 1 कोटी 35 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 

एस.टी.चे उत्पन्न वाढवण्याचा कालावधी म्हणजे उन्हाळी सुट्टी. या पार्श्वभूमीवर 1 मार्चपासून भारमान वाढवा अभियान सुरू केले होते. या कालावधीत उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले होते. परंतु कोरोनामुळे एस.टी.ला फटका बसला आहे. 26 दिवसांत सुमारे 1.35 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 
- संजय भोसले, मलकापूर आगारप्रमुख 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the foot of Malkapur depot