अबब..! चार महिन्यात तब्बल 95 सापांना जीवदान, वाचा महागावच्या सर्पमित्राची धडपड

गणेश बुरुड
Tuesday, 14 July 2020

लॉकडाउनच्या काळात प्रत्येक जग करमणुकीसाठी काही ना काही छंद जोपासताना पाहत होते; पण महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संतोष कुंभार या युवकांचा छंद काहीसा वेगळा ठरला.

महागाव : लॉकडाउनच्या काळात प्रत्येक जग करमणुकीसाठी काही ना काही छंद जोपासताना पाहत होते; पण महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संतोष कुंभार या युवकांचा छंद काहीसा वेगळा ठरला. या सर्पमित्राने लॉकडाउनच्या काळात तब्ब्ल 95 सापांना मानवी वस्तीमध्ये, तसेच घरामधून पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडले. या कामात त्याला संतोष रेडेकर याची मदत मिळते. 

लॉकडाउनच्या काळात पक्षी, प्राण्यांचा मुक्त विहार सुरू आहे. अशा कालावधीत साप आणि इतर प्राणीही महागाव व परिसरात मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. 22 मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाउन व संचारबंदीपासून परिसरात 95 विषारी व बिनविषारी सापांचा वावर आढळला. यासाठी वन्यजीव संरक्षणासाठी तत्पर असलेल्या संतोष कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सापांना पकडले व अधिवासात सोडले.

उंबरवाडी, हरळी, महागाव परिसरातून नाग, धामण, मणेर, तस्कर अशा विविध सापांना पकडून वन्य विभागांकडे व काही सापांना सुरक्षित ठिकाणी सोडले. त्यामुळे परिसरातून दोघांचेही कौतुक होत आहे. 

घरात साप आढळल्यास न मारता माझ्याशी संपर्क साधा
सध्या कोरोनामुळे जगभरात लॉकडाउनची परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व काही सेवा ठप्प आहेत; पण या काळात गावांसह शहरातील नागरिकांनी घरात साप आढळल्यास त्यास न मारता माझ्याशी संपर्क साधावा. 
- संतोष कुंभार, सर्पमित्र, महागाव 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Four Months, 95 Snakes Were Saved Kolhapur Marathi News