कुडचीत शंभर टक्के लाॅक डाऊन ; ड्रोन कॅमेऱ्याची अशी ही नजर...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

 उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई : रस्त्यांवर शुकशुकाट

रायबाग (बेळगाव) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे लागू करण्यात आलेल्या सीलडाउनला आज  (ता. १२) दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. प्रशासनासह पोलिसांच्या आवाहनाला साद देत नागरिक घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. मात्र  उल्लंघन करणाऱ्यांवर  पोलिसांकडून कारवाईस प्रारंभ  झाला आहे. शहरात बंदोबस्त कायम असून विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे.

कुडची येथे ११ एप्रिलपासून पूर्णतः सीलडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा, तालुका प्रशासन, पोलिस, आरोग्य व विविध खात्यांतर्फे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. काल (ता. ११) पासून कुडचीवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर आहे.

सीलडाऊन काळात दवाखाने, मेडिकल दुकाने व दूध अशा अत्यावश्यक सेवा वेळेचे बंधन घालून पुरविण्यात येत आहेत.
परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा  यांनी कर्नाटकात ३० एप्रिलअखेर लॉकडाऊनची अंमलबजावणी कायम केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कुडची येथील सीलडाऊनची मुदत वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रायबागचे तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, कुडचीचे पोलिस उपनिरीक्षक शिवराज दरीगौड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. बाणे, कुडची समुदाय आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कलट्टी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कुडची पूर्णपणे सीलडाऊन होती. पोलिसांनी येथे चांगला बंदोबस्त ठेवला आहे. आशा कार्यकर्त्या व आरोग्य खात्याचे पथक कार्यरत आहे.

अशा प्रकारेच सहकार्य करा

सीलडाऊन काळात शहरवासीयांनी दोन दिवस  चांगले सहकार्य केले आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी अशीच मदत यापुढेही करण्याचे आवाहन पोलिस, प्रशासन, आरोग्य व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fully lock down in kudchi belgum