"बॅरेकेडस्‌' आडूनच घट्ट झाली बहिण-भावाच्या नात्याची वीण...गडहिंग्लजला कंटेनमेंट झोनचा नियम पाळत अनोखे रक्षाबंधन

Gadhinglaj Has A Unique Rakshabandhan Following The Rules Of The Containment Zone Kolhapur Marathi News
Gadhinglaj Has A Unique Rakshabandhan Following The Rules Of The Containment Zone Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज सर्वत्र हा सण साजरा झाला असला, तरी कोरोनामुळे अनेक बहिण-भावांची भेट रोखली गेली. शहरातील शिवाजी चौकात कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने तेथे कंटेनमेंट झोन आहे. या झोनमध्ये असणाऱ्या दोन भावांना राखी बांधण्यासाठी शहरातच राहणारी बहिण कंटेनमेंट झोन असल्याने घरी जावू शकली नाही. अखेर या झोनचे नियम पाळत तिने बॅरेकेडस्‌च्या काठ्यामधूनच दोन्ही भावांना राखी बांधली. "प्रतिबंधा'च्या आडून या बहिण-भावांनी साजरे केलेले "रक्षाबंधन' त्यांच्या कायम लक्षात राहील, हे नक्की. 

आज (ता. 3) बहिण-भावाच्या नात्यांसाठी पवित्र असलेला रक्षाबंधनचा सण साजरा झाला. यादिवशी बहिण-भाऊ कोठेही असले तरी प्रत्यक्षात भेटून रक्षाबंधन साजरे करण्याचा प्रयत्न होत असतो. यंदा कोरोनामुळे या नात्यालाच बंधने आली. परजिल्ह्यात असलेल्या बहिणीला इकडे येता आले नाही किंवा भावाला बहिणीकडे जाता आले नाही. स्थानिकला असलेले बहिण-भाऊच भेटू शकले. परंतु केवळ स्थानिकलाच नव्हे, तर हाकेच्या अंतरावर असलेल्या बहिण-भावांच्या स्मरणात कायम राहील असा रक्षाबंधन साजरा झाला.

याचे असे झाले की, मनिषा कौस्तुभ डोमणे यांचे घर शिवाजी चौक परिसरात आहे. मनिषा यांचे माहेर करंबळी असले तरी आई व दोन भाऊ याच परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये रहायला आहेत. मनिषा यांचे सख्खे भाऊ सूरज व सचिन मोटे काही दिवसापूर्वी बेंगलोर व पुण्याहून आले आहेत. मोटे कुटूंब राहत असलेल्या अपार्टमेंटच्या परिसरात गेल्या आठवड्यात कोरोना रूग्ण आढळला आहे. यामुळे हा परिसर प्रतिबंधीत केला आहे.

आज रक्षाबंधनादिवशी भावांना राखी बांधण्याची इच्छा सौ. मनिषा यांनी व्यक्त केली. परंतु, कंटेनमेंट झोनमुळे त्या घरी जावू शकत नाहीत. जातीलही पण झोनचे नियम मोडणार. त्यातच घरी लहान बाळ असल्याने त्यांनी स्वत:च खबरदारी घेण्याचे ठरविले. भावांनाच अपार्टमेंटमधून खाली बोलावले आणि बॅरेकेंटींगजवळच दोन्ही भावांना मनिषा यांनी राखी बांधली. 

नियम न पाळणाऱ्यांना धडा 
कोरोना संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाकडून अनेक नियम केले आहेत. त्याची अंमलबजावणीही कडक करण्याकडे साऱ्यांचा प्रयत्न असतो. परंतु, त्यातूनही काही जण नियम मोडण्यात धन्यता मानतात. रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन असूनही सर्रासपणे ये-जा करतात. परंतु आज रक्षाबंधन असूनही एका बहिणीने कंटेनमेंट झोनच्या नियमांचे पालन करून लाकडी बांबूच्या आडून भावाला राखी बांधून इतरांना धडा घालून दिला.  

 
संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com