गडहिंग्लजला इतिहासात प्रथमच लाईव्ह आरती

अजित माद्याळे
Friday, 23 October 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गडहिंग्लजच्या इतिहासात प्रथमच यंदा महालक्ष्मी देवीची नवरात्री उत्सवातील आरती व्हाया सोशल मीडिया होत आहे.

गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गडहिंग्लजच्या इतिहासात प्रथमच यंदा महालक्ष्मी देवीची नवरात्री उत्सवातील आरती व्हाया सोशल मीडिया होत आहे. रोज सायंकाळी सात वाजता लाईव्ह आरतीला भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. 

मार्चपासून कोरोना संसर्गामुळे मंदिरे बंद आहेत. अजूनही हीच परिस्थिती कायम आहे. गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आता सुरू असलेला दसरा सणही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येत आहे. गावागावांत नवरात्रीनिमित्त भाविक मंदिरात बसण्याची प्रथा आहे; परंतु यंदा कोरोनामुळे घरीच बसून भाविक उपवास करत आहेत. 

गडहिंग्लज महालक्ष्मी मंदिर समिती ट्रस्टतर्फे भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी रोज सायंकाळची आरती लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. रोज सकाळी देवीच्या मूर्तीची विविध रूपांत पूजा बांधली जात आहे. दरवर्षी मंदिर ट्रस्टतर्फे नऊ दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होत असतात; परंतु यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून देवीची आरती माझं गडहिंग्लज फेसबुक पेजवर लाईव्ह केली जात आहे. तसेच स्थानिक टीव्ही चॅनेलवरही आरती दाखविली जात आहे.

फेसबुक लाईव्ह आरतीसाठी प्रशांत बाटे यांचे सहकार्य लाभत आहे. रोजच्या लाईव्हसाठी 300 हून अधिक भाविक ऑनलाईन असतात. याशिवाय आरतीचा व्हिडिओ दोन हजारांहून अधिक नागरिक पाहत आहेत. गडहिंग्लजच्या इतिहासात यंदा प्रथमच नवरात्रीच्या कालावधीत देवीची आरती लाईव्ह होत आहे. कोरोनामुळे मंदिरात प्रवेश बंद असला तरी भाविक घरी बसून आरतीला उपस्थिती लावत आहेत.

मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष राजेंद्र तारळे, उपाध्यक्ष लक्ष्मण पोवार व सदस्यांनी नियोजन केले आहे. कुंभार समाजाचे यासाठी सहकार्य मिळाले आहे. मंदिर ट्रस्टीने केलेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Gadhinglaj Live Aarti For The First Time In History Kolhapur Marathi News