गडहिंग्लज पालिका देणार नाट्य चळवळीला उभारी

Gadhinglaj Municipality Will Give Rise To The Drama Movement Kolhapur Marathi News
Gadhinglaj Municipality Will Give Rise To The Drama Movement Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगर परिषदेच्या पुढाकाराने आणि कला अकादमीच्या सहकार्यातून शहरात खंडित झालेल्या नाट्य चळवळीला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातलाच एक भाग म्हणून हौशी कलाकारांना व्यासपीठ देणे, कलेला चालना देणे आणि राज्यस्तरावरील स्पर्धेत स्थानिक कलाकारांचा सहभाग वाढावा या हेतूने पालिकेने कला अकादमीसाठी हॉल उपलब्ध करून दिला असून, शनिवारी (ता. 7) सकाळी साडेदहाला अभिनय शाळेचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. 

मूळचे गडहिंग्लजचे आणि चित्रपट अभिनेते स्वप्नील राजशेखर यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. कोरी म्हणाल्या, ""शहराला नाट्य चळवळीचा समृद्ध वारसा आहे. पूर्वी शहरातील दिग्गजांनी नाट्य परंपरा येथे रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु, मध्यंतरी ही चळवळ खंडित झाली. मात्र, दोन वर्षांपासून कला अकादमीच्या सहकार्याने ही चळवळ पुन्हा रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी विज्ञान केंद्र, योग केंद्रासाठीही पालिकेने पुढाकार घेतला. तसेच, आता नाट्य चळवळीत काम करण्याचे ठरवून कला अकादमीला पाठिंबा दिला आहे.

यापूर्वी कला अकादमीच्या सहकार्याने समाजाचा सांस्कृतिक विकास व्हावा, या हेतूने नाट्य महोत्सव घेतला. यावर्षी कोरोनामुळे या महोत्सवात खंड पडला असला तरी ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. नव्या अभिनय शाळेत शास्त्रशुद्ध मार्गदर्शनासाठी नाट्यकर्मी संजय हळदीकर, अतुल पेठे, प्रफुल्ल गवस, दिग्दर्शक संजय तोडकर, अजय कुरणे, अभिनेते संजय मोहिते, उमेश बोळके, जगन्नाथ निऊंगणे उपस्थित राहणार आहेत.'' 

कला अकादमीचे प्रमुख प्रा. शिवाजी पाटील यांनी आभार मानले. या वेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, अकादमीचे डॉ. मंगल मोरबाळे, प्रा. नीलेश शेळके आदी उपस्थित होते. 

मोफत अभिनय शिबिरे... 
नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, ""या शाळेत सातत्याने मोफत अभिनय शिबिरे होतील. बालकलाकारांना अभिनयाची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी म्हणून सर्टिफिकेट कोर्सही सुरू करण्यात येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये या कोर्सचे शुल्क 20 हजारांहून पुढे असते. येथे मात्र नाममात्र सहा हजारांत हा कोर्स उपलब्ध होईल. यातून बालकांसह हौशी कलाकारांचा आत्मविश्‍वास वाढण्यासह व्यक्तिमत्त्व विकासही होईल.'' 

संपादन - सचिन चराटी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com