
नागरिक, छोटे व्यापारी, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, दिव्यांग, मागासवर्गीय घटक आणि कर्मचारी या साऱ्या घटकांना विकासाच्या कवेत घेत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आज गडहिंग्लज नगरपरिषदेचा 74 कोटींचा सर्व घटकांसाठीचा लाभदायी "विकास संकल्प' सादर केला. या अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजुरी दिली असून लवकरच जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी ते पाठविण्यात येईल. अंदाजपत्रकात वाढीव हद्दीच्या विकासासाठी झुकते माप दिले असून शासनाकडून 54 कोटींच्या निधीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
गडहिंग्लज : नागरिक, छोटे व्यापारी, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, दिव्यांग, मागासवर्गीय घटक आणि कर्मचारी या साऱ्या घटकांना विकासाच्या कवेत घेत नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आज गडहिंग्लज नगरपरिषदेचा 74 कोटींचा सर्व घटकांसाठीचा लाभदायी "विकास संकल्प' सादर केला. या अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजुरी दिली असून लवकरच जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी ते पाठविण्यात येईल. अंदाजपत्रकात वाढीव हद्दीच्या विकासासाठी झुकते माप दिले असून शासनाकडून 54 कोटींच्या निधीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून कोरी यांनी यंदाचे चौथे अंदाजपत्रक सादर केले. अर्थसंकल्पीय भाषणात कोरी म्हणाल्या की, शहरातील अनेक घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे विश्वासपूर्वक आणि दिशादर्शक संकल्प सोडणारे हे अंदाजपत्रक आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आगामी वर्षात जमेपेक्षा खर्चाची बाजू जादा होत असल्याने शासनाकडून अधिकाधिक निधी खेचून आणण्याचा मानस आहे. त्यासाठी नेते ऍड. श्रीपतराव शिंदे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्यामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिका निधीवरचा ताण कमी होणार आहे.
पालिकेच्या उत्पन्नात वाढ आणि सार्वजनिक आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहतील. शहराचा सर्वांगीण विकास दृष्टिक्षेपात धरून मूलभूत सोयी-सुविधा नागरिकांना देण्याच्या दृष्टीने 2019-20 चा सुधारित आणि 2020-21 चा अनुमानित अर्थसंकल्प तयार केला आहे. स्वच्छ, सुंदर शहर ही संकल्पना साकारण्यासाठी या अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी द्यावी.
नगरसेवक महेश कोरी यांनी विविध खेळांसाठी तरतूद केली असली तरी व्यायामशाळेतील प्रशिक्षक मानधनासाठी चार लाखांची तरतूद करण्याची सूचना केली.
नगरसेविका शुभदा पाटील यांनी वाढीव हद्दीत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक तो आराखडा करण्याची गरज असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. त्यावर कोरी यांनी यापूर्वीच वाढीव हद्दीच्या सुविधांसाठी दहा कोटींच्या कामाचे प्रस्ताव तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेऊन मंत्रालयात पाठविल्याचे सांगितले.
विरोधी पक्षनेते हारुण सय्यद म्हणाले, ""विश्वासदर्शक आणि विकासाला दिशा देणारा हा अर्थसंकल्प असला तरी उत्पन्नाच्या दृष्टीने मागे आहे. दुकानगाळ्यांचे उत्पन्न दहा वर्षांपासून 23 लाखांपर्यंतच आहे. ते उत्पन्न 40 लाखांपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्यासाठी पोटभाडेकरूंवर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पंतप्रधान आवास योजनेतील केंद्राच्या 60 टक्के हिश्श्याचे अनुदान अद्याप आले नसून त्यासाठीही प्रयत्न व्हावेत. रिंगरोडच्या पूर्तीसाठी परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.'' यावर कोरी यांनी खासदार मंडलिक यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदानासाठी पाठपुरावा सुरू असून रिंगरोडच्या भूसंपादनासाठी टीडीआरचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवल्याचे सांगितले.
बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर यांनी शहरातील सर्व घटकांचा विकास नजरेसमोर ठेवून शिलकी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल कोरी व प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी राजेश बोरगावे, बसवराज खणगावे यांनीही चर्चेत भाग घेतला. उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, तसेच लेखाधिकारी शशिकांत मोहिते उपस्थित होते.
15 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प
2020-21 या अनुमानित अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न 19 कोटी 44 लाख 2 हजार अपेक्षित असून खर्च 19 कोटी 36 लाख 1 हजार 500 रुपये आहे. भांडवली जमेत (शासनाकडील निधी) 54 कोटी 94 लाख 84 हजार अपेक्षित धरले असून खर्च 54 कोटी 87 लाख 84 हजार इतका अपेक्षित आहे. महसुली व भांडवली असा 15 लाखांचा हा शिलकी अर्थसंकल्प आहे.
शुल्कात अंशत: वाढ
पालिकेने या अर्थसंकल्पातही कोणताही कर अगर शुल्कवाढ केलेली नाही. केवळ चहा-कॉफी, खानावळ, मिठाई, रसवंती, बिअर बार व सोडा वॉटर फॅक्टरी, लायसन्स फीमध्ये सात वर्षांनंतर यंदाच अंशत: वाढ केली आहे. सात वर्षे बदल केला नसल्याने यंदा हा निर्णय घेतल्याचे कोरी यांनी सांगितले.
पालिका फंडातून ठळक तरतुदी...
- लेक वाचवा अभियान : 25 लाख, अपंग कल्याण निधी : 18 लाख
- महिला बालकल्याण : 18 लाख, दहन-दफन विधी : 10 लाख
- नगराध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा : 18 लाख, नाट्य महोत्सव : 10 लाख
- शिक्षण मंडळ : 30 लाख, व्यायामशाळा साहित्य खरेदी : 20 लाख
- ओपन जिम व वॉकींग ट्रॅक : 40 लाख
- न. पा. इमारती देखभाल, रंगकाम : 30 लाख, उद्यान देखभाल : 25 लाख
- न. पा. शाळा दुरुस्ती : 20 लाख, जलतरण देखभाल 25 लाख
- सार्वजनिक शौचालय दुरुस्ती : 15 लाख, जॅकवेल, जलशुद्धिकरण केंद्र देखभाल : 25 लाख
- पालिका हद्दीबाहेर सेवा देण्यास नवी शववाहिका व दोन शवपेटी (फ्रिझरसह) : 12 लाख
- मैला संक्शन पंप खरेदी : 15 लाख, गटर, रस्ते दुरुस्ती : 80 लाख
- वाढीव हद्दीत मूलभूत सुविधा, पाईपलाईन : 92 लाख
- वाचनालयात सुसज्ज अभ्यासिका : 15 लाख
- वृक्ष प्राधिकरण : 20 लाख, खेळणीसाठी 25 लाख
- व्याख्यानमाला, बाल आनंद, ज्येष्ठ आनंद मेळावा : 15 लाख
- जंतुनाशके, कीटकनाशके खरेदी, भटकी कुत्री बंदोबस्त, भूसंपादन : 30 लाख
- निवृत्त कर्मचारी सातवा वेतन आयोग फरक व कर्मचारी अंशदान, बोनस : 76 लाख.