गडहिंग्लज उपविभागात कारखान्यांना पुरेल इतका ऊस

अजित माद्याळे
Thursday, 15 October 2020

महिन्याभरात सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामात कार्यरत असणाऱ्या सर्व कारखान्यांना पुरेल इतका ऊस यंदा गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात उपलब्ध आहे.

गडहिंग्लज : महिन्याभरात सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामात कार्यरत असणाऱ्या सर्व कारखान्यांना पुरेल इतका ऊस यंदा गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात उपलब्ध आहे. सर्वच कारखान्यांनी यंदाच्या गाळपाचे आपापले उद्दीष्ट निश्‍चित केले असले तरी ज्याचे ऊस तोडीचे, गाळपाचे नियोजन आणि ऊस बिल चांगले आहे, त्यांच्या गाळपाची उद्दीष्टपूर्ती होणार आहे. अन्यथा शेजारच्या कारखान्यांमध्ये उसाची विभागणी होण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

यावर्षी उसाचे उत्पादन चांगले येण्याचे संकेत आहेत. वादळी वाऱ्यामुळे ऊस पीकही भुईसपाट झाल्यामुळे काहीशी उत्पन्नात घट येण्याची भिती व्यक्त होत असली तरी गाळपावर फार मोठा परिणाम होईल इतकाही तुटवडा जाणवणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. परंतु, एफआरपीपेक्षा अधिक ऊस दर किती मिळणार याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी संघटनेच्या ऊस परिषदेचीही उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. 

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना, हेमरस, इको-केन आणि अथर्व (दौलत) अशी चार कारखाने यंदा उसाचे गाळप करतील. आजरा कारखान्याची चाके यंदा सुरू करण्याच्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू असल्या तरी अद्याप यश आलेले नाही. यातील काही कारखान्यांनी यंदा गाळप विस्तार केल्याने अधिकाधिक गाळप करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. गतवेळी अंतिम टप्प्यात गाळप सुरू केलेल्या अथर्व शुगर्सने (दौलत) यंदा पूर्ण ताकदीनिशी गाळप करण्याची शक्‍यता आहे. उसाची उपलब्धतता, तोडीचे नियोजन आणि गाळप विस्तार या पार्श्‍वभूमीवर यंदा सर्व कारखाने 100 ते 120 दिवसापर्यंत चालतील अशी परिस्थिती आहे. 

दरावर ठरेल गाळपाचे भवितव्य 
कर्नाटकातील चार ते पाच कारखाने दरवर्षी या तीन्ही तालुक्‍यातून उसाची उचल करतात. परंतु, महाराष्ट्रापेक्षा तेथील कारखान्यांनी दोन वर्षापासून कमी दर देत असल्याने गतवर्षी या कारखान्यांना शेतकऱ्यांनी बाय-बाय केला. यामुळे या उपविभागातील सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने शंभर दिवसावर चालली. दरवर्षी महाराष्ट्रातील शेजारचे आणि कर्नाटकातील कारखान्यांकडून दीड ते दोन लाख टनाची उसाची उचल होते. तितकाच ऊस कर्नाटकातून चंदगडमधील काही कारखाने आणतात. यंदाची ऊसाची उपलब्धतता चांगली असली तरी दराच्या आलेखावर कारखान्यांच्या गाळप उद्दीष्टाचे भवितव्य ठरणार आहे. 

तालुकानिहाय ऊस क्षेत्र व उत्पादन 
- गडहिंग्लज : 9297 हे., उत्पादन : 6 लाख टन 
- चंदगड : 11544 हे., उत्पादन : 7 लाख टन 
- आजरा : 5300 हे., उत्पादन : 4 लाख टन 

यंदाचे नियोजित गाळप क्षमता व एकूण गाळप 
- गोडसाखर, गडहिंग्लज- दैनंदिन गाळप क्षमता : 2900 मे. गाळप : 2.90 लाख टन 
- हेमरस - क्षमता 4800 मे. टन, गाळप : 6 लाख 
- इको केन - क्षमता 2900, गाळप : 3 लाख 
- अथर्व शुगर्स - क्षमता 3500, गाळप : 6 लाख 
(गाळपाचे आकडे अंदाजित आहेत.) 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In The Gadhinglaj Subdivision There Is Enough Sugarcane To Supply The Factories Kolhapur Marathi News