गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरव यात्रा 11 फेब्रवारीला

दीपक कुपन्नावर
Friday, 31 January 2020

सीमा भागाचे श्रद्धास्थान म्हणून नावलौकिक असणाऱ्या येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाची यात्रा 11 फेब्रवारी रोजी होणार आहे. दरम्यान, 10 रोजी सायंकाळी पालखी सोहळा होणार आहे. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ आणि घरोघरी तयारी सुरू झाली आहे. एक दिवशीय होणाऱ्या या यात्रेत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात.

गडहिंग्लज : सीमा भागाचे श्रद्धास्थान म्हणून नावलौकिक असणाऱ्या येथील ग्रामदैवत श्री काळभैरवाची यात्रा 11 फेब्रवारी रोजी होणार आहे. दरम्यान, 10 रोजी सायंकाळी पालखी सोहळा होणार आहे. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ आणि घरोघरी तयारी सुरू झाली आहे. एक दिवशीय होणाऱ्या या यात्रेत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. 

नवे वर्ष सुरू झाले की, सर्वांनाच काळभैरव यात्रेचे वेध लागतात. गडहिंग्लजसह लगतच्या बड्याचीवाडी, बहिरेवाडी (ता. आजरा), हडलगे (ता. चिक्कोडी) या ठिकाणीही श्री काळभैरवाची यात्रा साजरी केली जाते. येथून पाच किलोमीटर अंतरावर असणारे डोंगर कपारीतील मंदिरात मुख्य यात्रा भरते. यात्रेच्या आदल्या दिवशी येथील शिवाजी चौकातील मंदिरातून पालखी मिरवणुकीने यात्रास्थळी रवाना होते. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनातर्फे तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेत यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर लगबग वाढली आहे. यात्रेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव व्यापाऱ्यातर्फे सुरू आहे. 

प्रशासनाने देखील यात्रेच्या नियोजनात आहे. येथील एसटी आगारातर्फे सुमारे 40 बस दिवसभर भाविकांना मंदिरस्थळी सोडण्यासाठी कार्यरत असतात. आगारात ध्वनीक्षेपकावरून याबाबतची माहिती दिली जात आहे. यात्रेच्या आदल्या दिवशी पालखी मिरवणुकीने मंदिराकडे रवाना होते. या मिरवणुकीत पालखीसमोर असणाऱ्या सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची प्रथा आहे.

येथील मुस्लिम समाजातील अत्तार कुटुंबीयाकडून हे गोंडे तयार करण्याचे काम दिवाळीपासून सुरू झाले आहे. स्थानिक परिसरासह लगतच्या कर्नाटक आणि गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. स्थानिक स्तरावर घरोघरी यात्रेची तयारी सुरू आहे. घराची रंगरंगोटी, धुलाई यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. या यात्रेनंतरच तालुक्‍यातील ग्रामीण भागातील यात्रा सुरू होतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj's Gramdaivat Kalbhairav Yatra On 11th February Kolhapur Marathi News