सांगलीतील अंकलखोप परिसरात गव्याच्या कळपाचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

कृष्णा नदीकाठावर ऊस शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने अधूनमधून गवा दृष्टीस पडत असल्याचे स्थानिक सांगतात.

अंकलखोप (सांगली) : अंकलखोप (ता. पलूस) परिसरात रविवारी रात्री गव्याचा कळप दिसल्याने खळबळ उडाली. हलगी परिसरातील वैभवनगर ते रामरावनगर या परिसरातील सुमारे दोन किमी रस्त्यावर तीन गवे दिसल्यानंतर काही ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच अनिल विभुते व सहकाऱ्यांनी गव्याचा पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांना रोखले. 

रात्रीच ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क करुन या प्रकाराची माहिती दिली. 

कृष्णा नदीकाठावर ऊस शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने अधूनमधून गवा दृष्टीस पडत असल्याचे स्थानिक सांगतात. नागठाणे परिसरात काही दिवसांपूर्वी गवा दिसल्याची चर्चा होती. मात्र आता अंकलखोप परिसरात गव्याचा कळपच ग्रामस्थांच्या नजरेस पडल्याने खळबळ उडाली. गावच्या हद्दीतील वैभवनगर परिसरात रविवारी रात्री काही ग्रामस्थांना 2 ते 3 गव्यांचा कळप संचार करताना दिसला. रस्त्यावरुन शांतपणे जाणाऱ्या या कळपाला काहीजणांनी हटकले. सरपंच अनिल विभुते यांच्यासह काही ग्रामस्थ घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. तोपर्यंत काही हुल्लडबाजांनी गव्याच्या कळपाचा दुचाकीवरुन पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. कळप बिथरण्याची भीती लक्षात घेत ग्रामस्थांनी हुल्लडबाजांना रोखले.

हे पण वाचा मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gawa fund in sangli ankalkhop maharashtra