गुडन्यूज ः कोल्हापुरात जाहिरातींच्या शुटींगसाठीही कॉर्पोरेट कंपन्या सकारात्मक

प्रतिनिधी
Wednesday, 20 May 2020

मुंबई आणि पुणे येथील वाढत्या कोरोना संसर्गामुळे शुटींगसाठी कोल्हापूर हा एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी वाहिन्यांना लवकरात लवकर मालिकांचे शुटींग करावे लागणार असल्याने अनेक वाहिन्या येथे शुटींगसाठी इच्छुक आहेत. 

कोल्हापूर ः येथील शुटींगसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना आता जाहिरातींच्या शुटींगसाठीही पाचहून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी विचारणा केली असून त्यांच्याशी सकारात्मक बोलणी झाली आहेत. त्यामुळे मालिका, वेबसिरीजबरोबरच जाहिरातींच्या शुटींगलाही येथे प्रारंभ होणार आहे. 
दरम्यान, लॉकडाऊनमधील विस्कळीत अर्थव्यवस्थेनंतर कंपन्या जाहिराती करतील का, अशी संभ्रमावस्था होती. मात्र, मोठ्या कंपन्याच जाहिरातीसाठी इच्छुक असल्याचे सकारात्मक चित्रही यानिमित्ताने ठळक झाले आहे. 
मुंबई आणि पुणे येथील वाढत्या कोरोना संसर्गामुळे शुटींगसाठी कोल्हापूर हा एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी वाहिन्यांना लवकरात लवकर मालिकांचे शुटींग करावे लागणार असल्याने अनेक वाहिन्या येथे शुटींगसाठी इच्छुक आहेत. 
नव्या मालिकांसह काही निर्माते आणि निर्मिती संस्थांनी वेबसिरीजही संपर्क साधला आहे. त्यांच्याशी सर्व सकारात्मक चर्चा झाली असून आता केवळ शासनाच्या नियमावलीसह अधिकृत परवानगीची प्रतीक्षा आहे. ही प्रक्रिया सुध्दा लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व आवश्‍यक तयारी चित्रपट, मालिका व्यावसायिकांनीही केली आहे. शहर आणि परिसरातील शंभरहून अधिक लोकेशन्स सध्या सज्ज असून पुणे, मुंबईतून निर्मिती संस्था येणार असल्या तरी केवळ पंधरा ते वीस टक्के लोकच तिकडून येतील आणि त्यांच्या आवश्‍यक त्या सर्व तपासण्या केल्यानंतरच त्यांना शुटींगसाठी परवानगी दिली जाणार आहे. शुटींग करतानाही त्यांना विशिष्ट नियमावली दिली जाणार असून त्या नियमांचे पालन करूनच शुटींग होणार आहे. 

चित्रनगरीत वेगाने काम... 
कोल्हापूर चित्रनगरीत नियोजनानुसार पूर्वीपासून एका मालिकेचे शुटींग सुरू आहे. त्याशिवाय येत्या काळात वाढणाऱ्या शुटींगच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक लोकेशन्स वाढवण्यावर येथे भर दिला गेला आहे. पंधरा जूनपर्यंत आणखी एक मोठा भव्य स्टुडिओ येथे साकारला जाणार आहे. त्याशिवाय किरकोळ दुरूस्त्यांवरही भर दिला गेला आहे. ही सर्व कामे चित्रनगरीत वेगाने सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News: Corporates are also positive for shooting advertisements in Kolhapur