esakal | दसऱ्याच्या खरेदीने सुखावली गडहिंग्लज बाजारपेठ
sakal

बोलून बातमी शोधा

Good Turnover Due To Dussehra In Gadhinglaj Market Kolhapur Marathi News

तब्बल आठ महिन्यांनी चांगली उलाढाल येथील बाजारपेठेने अनुभवली. कोरोनामुळे आलेली मरगळ दसऱ्याच्या मुहूर्तावर दूर झाल्याने बाजारपेठ सुखावली.

दसऱ्याच्या खरेदीने सुखावली गडहिंग्लज बाजारपेठ

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : तब्बल आठ महिन्यांनी चांगली उलाढाल येथील बाजारपेठेने अनुभवली. कोरोनामुळे आलेली मरगळ दसऱ्याच्या मुहूर्तावर दूर झाल्याने बाजारपेठ सुखावली. दरवर्षीच्या तुलनेत सव्वापटीने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाली. सोने, मोबाईलसह इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंनाही ग्राहकांनी अधिक पसंती दिल्याचे दिसले. दिवसभरात सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली होती. 

गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. बाजारपेठेत पण वर्दळ वाढली. त्यामुळेच दसऱ्याच्या मुहूर्ताकडे व्यापारी, विक्रेत्यांनी डोळे लागले होते. त्यासाठी व्यापाऱ्यांनी गेल्या आठभरापासून तयारी केली होती. सकाळपासूनच बाजारपेठेकडे ग्राहकांची पावले वळली. दुपारनंतर यात अधिक भर पडली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. त्याचाही ग्राहक फिरून मागोवा घेताना दिसले.

शहरांसह ग्रामीण भाग, चंडगड, आजरा, कागल तालुक्‍यातूनही लोक खरेदीला आले होते. सोन्याचा दर वाढला असला तरी महिलांची दसऱ्यांच्या मुहूर्तावर खरेदीकडे कल राहिल्याचे शुभ संगम ज्वेलर्सचे अमर दड्डी यांनी माहिती दिली. अनेक महिलांनी भांडी खरेदीलाही प्राधान्य दिल्याने गर्दी झाल्याचे विक्रेते अभय खोत यांनी सांगितले. टीव्ही, मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन यासह अनेक इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठीही नागरिकांची गर्दी दिसली. मुहूर्तावर प्लॅट, भूखंड खरेदीही अनेकांनी पूर्ण केली. बच्चे कंपनीसह मोठ्यानींही व्यायामासाठी सायकल खरेदी केली. 

वाहनांसाठी गर्दी 
कोरोनामुळे प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची साधने टाळली जात आहेत. त्यामुळेच यंदा वाहनविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सूर्या होंडाचे संदीप कोळकी यांनी सांगितले. अनेकांनी गेल्या चार दिवसांत वाहने, त्यांचा रंग मॉडेल सहकुटंब येऊन निश्‍चित केले होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर ही वाहने घरी नेण्यात आली. चारचाकी वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गर्दी होती. नव्या वाहनांबरोबर मोबाईलद्वारे फोटो काढण्यासाठी लगबग दिसली. 

संपादन - सचिन चराटी