गावागावांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध: जानेवारी अखेरीस बिगुल शक्‍य 

निरंजन सुतार 
Saturday, 5 December 2020

मिरज तालुक्‍यातील 15 गावांत रंगणार रणसंग्राम;

आरग  (सांगली): कोरोनामुळे प्रशासकांची नियुक्ती करून पुढे ढकललेल्या मिरज तालुक्‍यातील पंधरा ग्रामपंचायतीना निवडणुकीचे वेध लागले आहेत. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.महाराष्ट्रातील पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुका आता झाल्या आहेत. त्याच्‌ पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग जानेवारीच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागातील ग्रामपंचायतींत पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. 

मिरज तालुक्‍यातील 15 ग्रामपंचायतीची जून-जुलैमध्ये मुदत संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार शासकीय अधिकारी असलेल्या प्रशासकांच्या हाती देण्यात आला. गावागावांत निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते व कार्यकर्त्यांनी कोरोना काळात सामाजिक भावना जपण्याचा प्रयत्न केला. 

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गाव पातळीवरील स्थानिक राजकारणात जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पूर्व भागातील काही ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, राज्यात महा विकास आघाडीची सत्ता असल्याने ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे निवडणुकीचा ज्वोर अधिकच चढू लागला आहे. 

सर्वच पक्ष आणि संघटनांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी तयारी चालवली आहे. निवडणुकीत कोण कोणाशी जमवून घेईल याचा अंदाज बांधणे सध्या कठीण असले तरी गावपातळीवरील राजकारण लक्षात घेऊन जमवा जमव होऊ शकते. जानेवारीत निवडणुका होण्याची अधिक शक्‍यता आहे. त्यात मुख्यतः आरग, लिंगनूर, मालगाव, भोसे, कवलापूर, एरंडोली, विजयनगर आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायतींत रणसंग्राम रंगणार आहे. 

हेही वाचा- Success Story: 20 गुठ्यांत काढला तब्बल 63 टन ऊस -

विधानसभा निवडणुकीची पेरणी ग्रामपंचायत निवडणुकीत होत असल्याने. आपल्या समर्थकांना कडे जास्त ग्रामपंचायती याव्यात असा प्रयत्न भाजपचे आमदार डॉ. सुरेश खाडे,महाविकासआघाडीकडून सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी हालचाली गतिमान सुरू केल्या आहेत. पूर्व भागातील टोकाचा संघर्ष असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या लढती होणार आहे. 

सरपंच आरक्षण आकडेही लक्ष 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे कारभारी होण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र सरपंच आरक्षणाकडे इच्छुकांची लक्ष लागून राहिले आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat elections miraj 15 village preparation sangli