'या' तालुक्यातील तरुण कोविड सेंटरमध्ये जाऊन देताहेत योग मुद्रांचे प्रात्यक्षिक

सुनील कोंडुसकर
Friday, 24 July 2020

कोरोना हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या तोंडचे पाणी पळते. कोरोना केअर सेंटरमध्ये नेमणूक केलेल्या अनेकांनी आजारपणाची कारणे देऊन ड्यूटी नाकारली. स्वतःच्याच कुटुंबीयांनीही कोरोना बाधितांना अव्हेरल्याच्या घटना ताज्या आहेत.

चंदगड : कोरोना हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या तोंडचे पाणी पळते. कोरोना केअर सेंटरमध्ये नेमणूक केलेल्या अनेकांनी आजारपणाची कारणे देऊन ड्यूटी नाकारली. स्वतःच्याच कुटुंबीयांनीही कोरोना बाधितांना अव्हेरल्याच्या घटना ताज्या आहेत. अशा काळात येथील काही तरुण पुढाकार घेतात, थेट कोविड सेंटरमध्ये जातात. सोशल डिस्टन्सिंग राखत बाधित रुग्णांशी संवाद साधतात. स्वतः बनवलेला आयुर्वेदिक काढा देतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग मुद्रांचे प्रात्यक्षिक घेतात. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्‍वास देतात. हे सगळे अविश्‍वसनीय वाटत असले तरी वास्तव आहे. 

कोरोनाने जगण्याचे संदर्भ बदलले, तसेच मानवी संबंधाबाबतही अनेक प्रश्‍न निर्माण केले. "कोरोना बाधित' ही नवी जात निर्माण झाली. समाजाकडून अशा लोकांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडत आहेत. कोरोना सेंटर आपल्या भागात नको, असे म्हणणाराही एक वर्ग आहे. येथील नीलेश सामानगडकर, अभिषेक नेसरीकर, रमेश देसाई, बबलू जुळवी, विवेक सबनीस, उद्योजक सुनील काणेकर सुरवातीपासून कोरोनाच्या लढाईत सामाजिक जबाबदारी निभावत आहेत.

या घटना ऐकून ते अस्वस्थ झाले. आता या रुग्णांशी थेट संवाद साधायला हवा. त्यांचा आत्मविश्‍वास वाढवायला हवा, असा त्यांनी निर्धार केला. यादगूड (कर्नाटक) येथील आयुर्वेदाचार्य डॉ. चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाने तयार केलेला आयुर्वेदिक काढा आणि योग मुद्रांचे ज्ञान देण्याचे ठरवून त्यांनी आज येथील कोविड सेंटर गाठले. तिथे तीन मजल्यावर एकूण 154 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

प्रत्येक मजल्यावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. आयुर्वेदिक काढा प्यायला दिला. काणेकर यांनी योग मुद्रांचे प्रात्यक्षिक करवून घेतले. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, हे समजावून सांगितले. पुढील तीन दिवस आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगितल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्‍टरांनीही आनंद व्यक्त केला. चार महिन्यांत पहिल्यांदाच समाजातून एवढा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. 

प्रत्येकाचे समाजाप्रती कर्तव्य आहे. एखाद्या किरकोळ कारणाने समाज दुभंगला जाणे योग्य नाही. गरजवंतांपर्यंत जाऊन मदत, मार्गदर्शन करण्याची आमची तयारी आहे. 
- नीलेश सामानगडकर, चंदगड

 

संपा़दन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidance From The Youth By Visiting The Covid Center Kolhapur Marathi News