वारी टळली, तरी वारीसाठी साठवलेल्या पैशाचा असा केला वापर 

अशोक तोरस्कर
मंगळवार, 30 जून 2020

दरवर्षी येथील वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, मात्र यावर्षी कोरोनामुळे वारी रद्द करण्यात आली. वारी रद्द झाली तरी विठ्ठलाची आस मात्र किंचितही कमी झालेली नाही.

उत्तूर : दरवर्षी येथील वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, मात्र यावर्षी कोरोनामुळे वारी रद्द करण्यात आली. वारी रद्द झाली तरी विठ्ठलाची आस मात्र किंचितही कमी झालेली नाही. यामुळे वारीसाठी होणारा खर्च उत्तूरमध्ये सभापंडप उभारणीसाठी करण्याचा निर्णय वारकऱ्यांनी घेतला. 

येथील विठ्ठल-रुक्‍मिणी वारकरी सांप्रदाय मंडळाची स्थापना दहा वर्षापूर्वी झाली. दरवर्षी येथील 100 वारकरी दोन वाहनांतून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. सर्वांकडून वर्गणी जमा करून प्रवास, जेवण व निवास यावर खर्च केले जातात. सुरवातील काही वर्षे वारी पार पडली, मात्र यानंतर पंढरपूरला गेल्यावर तेथे राहण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला, यामुळे बामणे (ता. भुदरगड) व उत्तूर येथील वारकऱ्यांनी मिळून 40 बाय 40 फूट आकाराचा मठ बांधला. यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. यामुळे बामणेकर यांची कार्तिक वारीसाठी, तर उत्तूरकर यांची आषाढी वारीसाठी राहण्याची सोय झाली. याठिकाणी वारकरी चार-पाच दिवस राहू लागले.

यावर्षी कोरोनामुळे आषाढी वारी शासनाने रद्द केली. याबाबत मंडळाची बैठक झाली. वारी रद्द झाली मात्र वारीसाठी अनेक वारकरी वर्षभर पैसे बाजूला काढून ठेवतात. हे पैसे देवासाठीच खर्च व्हावेत, अशी त्यांची ईच्छा असते. यामुळे हे पैसे कशावर खर्च करायचे यावर विचारमंथन झाले. शेवटी हे पैसे सभामंडप उभारण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय झाला.

वर्षभर मौनी महाराज मठात मंडळाचे कार्यक्रम होतात, मात्र याठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने अडचण निर्माण व्हायची यासाठी येथील मौनी महाराज मठासमोर 30 बाय 40 आकाराचा सभामंडप उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दोन लाखाचा आराखडा तयार केला आहे. बुधवारी आषाढी एकादशी दिवशी याची सुरवात होणार आहे. सोशल डिस्टिंक्‍शन पाळून जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ होणार आहे. 

मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग यमगेकर, उपाध्यक्ष शिवाजी पावणे, खजानीस श्रीकांत मांगले, सचिव संकेत पाटील यांच्या व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मंडळाची बैठक झाली. यामध्ये सभामंडप उभारण्याचा निर्णय झाला. यानुसार कामाला सुरवात होणार आहे. 
- ज्ञानदेव धुरे, चोपदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hall To Be Built With Wari's Money Kolhapur Marathi News