कर्जमाफीची सवय बंद झाली पाहिजे : मंत्री हसन मुश्रीफ

hasan mushrif say Debt forgiveness habits should be discontinued
hasan mushrif say Debt forgiveness habits should be discontinued

कोल्हापूर - शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची सवय झाली आहे, ती बंद झाली पाहिजे, त्यासाठी त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळायला पाहिजे, असे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. नगर जिल्ह्यात एका शाळकरी मुलाने शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका म्हणून केलेल्या कवितेनंतर त्याच्याच वडिलांनी केलेली आत्महत्या हृदयदावक आणि दुर्दैवी असल्याचेही श्री. मुश्रीफ या वेळी म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आज कोल्हापुरात आलेल्या श्री. मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामागृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘नगर जिल्ह्यात एका मुलाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना या मार्गाला जाऊ नका म्हणून आवाहन करणारी कविता लिहिणाऱ्या शाळकरी मुलाच्या वडिलांनीच त्यानंतर तीन तासांत आत्महत्या करण्याचा प्रकार हृदयदावक आणि दुर्दैवी आहे, आज वृत्तपत्रातून मला ही माहिती समजली. 
राज्य शासनाने गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या नावावर वर्ग केली. शेतकऱ्यांना दोनप्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. एकट्या नगर जिल्ह्यात २५०० कोटींची कर्जमाफी दिली आहे. पूरग्रस्तांचे ७० टक्के पैसे जमा केले आहेत. तूर, कापूस यासारखी पिके हमीभावाने स्वतः शासनाने खरेदी करण्यास सुरवात केली आहे.’’

मुस्लिमांना फक्त शिक्षणात आरक्षण

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी चिंतामुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरचा पालकमंत्री म्हणून त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू, विशेषतः त्याच्या मुलावर काय परिणाम झाला असेल. या कुटुंबाला जास्तीत जास्त अर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.’’
मुस्लिम आरक्षणाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘‘मुस्लिमांना नोकऱ्यांत आरक्षणचा निर्णय नाही, फक्त शिक्षणात आरक्षण देण्यात येणार आहे. 

एखादा विषय दुसरीकडे नेण्याची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेहमीची सवय आहे, त्यातून त्यांनी याबाबत आरोप केले आहेत. शेतकरी आत्महत्येची कारणे शोधली पाहिजेत. पाऊस चांगला झाला, कर्जमाफी झाली तरीही असे प्रकार का होतात का ते तपासावे लागेल. नियमित कर्ज परतफेड करणारे आणि दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल.’’

महाडिकांवर नंतर बोलू

गेले दोन दिवस माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीवर सुरू केलेल्या टीकेबाबत विचारले असता कोल्हापूरच्या विषयावर नंतर बोलू, असे सांगत श्री. मुश्रीफ यांनी या विषयाला बगल दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com