
एक नव्हे तर तब्बल पाच परिक्षा झाला तो उत्तीर्ण...
कोल्हापूर - यवलूज (ता.पन्हाळा) येथील सम्राट मुकुंदा यादव याने विनाक्लास अपार कष्ट व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि तब्बल पाच परीक्षेत यश मिळवले.
त्याने आतापर्यंत सहायक लोको पायलट (भारतीय रेल्वे), टेक्निशियन (भारतीय रेल्वे), टेक्निकल सांटिफिक असिस्टंट (स्टाफ सिलेक्शन कमीशन), सहायक कार्यशाळा अधीक्षक (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ), ज्युनिअर इंजिनिअर (बृहमुंबई महानगरपालिका) या परीक्षेत यश मिळवले.
सम्राटच्या घरची परिस्थिती बेताची. वडील मुकुंदा सरकारी नोकरीत होते. सम्राटचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले.दहावीच्या परीक्षेत ६८ टक्के गुण मिळवून तो न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तिसरा आला. छोटीमोठी नोकरी करून घराला हातभार लावता येईल या उद्देशाने त्याने दहावीनंतर तंत्रशिक्षण पूर्ण केले; पण पुढे न्यू पॉलिटेक्निक कॉलेज (कोल्हापूर) येथे डिप्लोमा पूर्ण केला. त्यांतर संजीवनी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट पन्हाळा येथे डिग्रीचे शिक्षण घेतले.
२०१५ मध्ये केली अभ्यासाला सुरवात
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतरही सम्राटची नोकरी करण्याची इच्छा होईना. वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. प्रशिक वाचनालय आणि ग्रंथालय येथे २०१५ मध्ये अभ्यासाला सुरवात केली. याच दरम्यान वडिलांचे निधन झाले.त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांचा आईवर येऊन पडली. अशा परिस्थितीत आई व मोठा भाऊ सुरजच्या पाठबळावर त्याने अभ्यास सुरुच ठेवला. सुरवातीस अपयश आले; पण अपयशाने खचून न जाता त्याने दररोज १२ ते १३ तास अभ्यास केला. आणि दोन वर्षात वेगवेगळ्या परीक्षेत यश मिळवले. यासाठी त्याला प्रशिक वाचनालय आणि ग्रंथालयचे डॉ. प्रा. सुहास राऊत यांचे
मार्गदर्शन मिळाले.
इंजिनिअरिंग करून तुटपुंज्या पगारावर नोकरी करण्याची इच्छा होईना. घरच्या पाठबळावर कसून अभ्यास केला. त्यामुळे हे यश मिळालं. ध्येय उराशी बाळगून आत्मविश्वासाने कोणत्याही क्षेत्रात कष्ट केले तर यश नक्की मिळते.
- सम्राट यादव
सम्राटने मोठा अधिकारी व्हावं, हे त्याच्या वडिलांचं स्वप्नं होतं. ते खरं ठरलं. पोरग्यानं नाव केल्याचा आनंद आहे; पण हा आनंद साजरा करायला सम्राटचे वडील हवे होते.
- शोभा यादव, सम्राटची आई
Web Title: Have Studied Competitive Exams And Achieved Success All Five
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..