गडहिंग्लज-संकेश्‍वर मार्गावर तासभर वाहतूक ठप्प, काय आहे बातमी वाचा सविस्तर

अजित माद्याळे
Tuesday, 15 September 2020

सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प राहिली. आंदोलनासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

गडहिंग्लज : शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करून कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे गडहिंग्लज-संकेश्‍वर राज्य मार्गावर निलजीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प राहिली. आंदोलनासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजावर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त करत सकाळी अकरा वाजता सागर मांजरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. मराठा समाजातील असंख्य बांधव एकत्र येऊन निलजीजवळ राज्य मार्गावर ठाण मांडून बसत गडहिंग्लज-संकेश्‍वर मार्ग वाहतुकीसाठी बंद केला.

बारापर्यंत हे आंदोलन चालले. सुमारे तासभर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने वाहने थांबून होती. या वेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्याबापाचे, एक मराठा-लाख मराठा आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी मांजरे व आप्पा शिवणे यांची भाषणे झाली. मांजरे यांनी आमदार राजेश पाटील यांनी स्वत: येवून निवेदन स्वीकारल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. परंतु, आमदार पाटील मुंबईत असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून मांजरे यांच्याशी संपर्क साधला.

आरक्षणाबाबत शासन सर्वोच्च न्यायालयात लढण्याची तयारी करत असून हसन मुश्रीफ, सतेज पाटील व मी स्वत: याप्रश्‍नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. याप्रश्‍नी आम्ही मराठा समाजासोबत असून विधानसभेत निश्‍चित आवाज उठवू, अशी ग्वाही देवून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर मांजरे यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. शिवणे यांनी समाजाची स्थिती बिकट असून मेरीट असूनही मराठा मुले शिक्षण व नोकरीत मागे राहत असल्याने कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. 

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद, अविनाश माने यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त होता. एकही वाहन सोडले जात नसल्याने दोन्ही बाजूने एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहने थांबून होती. आंदोलन झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास उशीर लागला. काशिद यांच्याकडे आंदोलकांनी निवेदन सादर केले. आंदोलनात संजय पाटील, विकास मोकाशी, राजेंद्र तारळे, सागर कुराडे, मनोज पोवार, शैलेश इंगवले, राहुल शिंदे, चंद्रकांत सावंत, विठ्ठल भम्मानगोळ, राहूल शिरकोळे आदी सहभागी झाले होते. 

काय म्हणाले आंदोलक 
- अनेक मराठा बांधवांच्या बलीदानाने मिळाले होते आरक्षण 
- शासनाच्या वेळकाढूपणा धोरणाने स्थगिती मिळाल्याचा आरोप 
- स्थगितीमुळे तरुण-तरुणी शिक्षण, नोकरीच्या आरक्षणापासून वंचित 
- शासनाने न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करावी 
- ठोस निर्णय न झाल्यास सकल मराठा समाज आक्रमक होणार 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An Hour-Long Traffic Jam On The Gadhinglaj-Sankeshwar Road Kolhapur Marathi News