मोठी बातमी : कोरोना लसीची मानवी चाचणी होणार 'या' जिल्ह्यात....

मल्लिकार्जुन मुगळी
Sunday, 26 July 2020

हैद्राबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने कोरोनावरील कोवॅक्‍सीन ही स्वदेशी लस तयार केली आहे.

बेळगाव - स्वदेशी लस म्हणून देशभरात कौतुकाचा व औत्सुक्‍याचा विषय बनलेल्या कोवॅक्‍सीन ची मानवी चाचणी बेळगावात पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील जीवनरेखा हॉस्पीटलची निवड आयसीएमआरने मानवी चाचणीसाठी केली आहे. पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही टप्प्यातील मानवी चाचणी पुढील आठवड्यात होणार आहे. या मानवी चाचणीसाठी स्वंयसेवकांची निवड सध्या हॉस्पीटलकडून सुरू आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ज्यांचा अहवाल निगेटीव्ह येईल त्यांची निवड या मानवी चाचणीसाठी केली जाणार आहे. विविध वयोगटातील महिला व पुरूष मिळून 200 स्वयंसेवकांनी या मानवी चाचणीसाठी जीवनरेखा हॉस्पीटलकडे नोंदणी केल्याची माहिती संचालक डॉ. अमित भाते यानी दिली आहे.

हैद्राबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने कोरोनावरील कोवॅक्‍सीन ही स्वदेशी लस तयार केली आहे. आयसीएमआर ही शासकीय संस्था व भारत बायोटेक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या लसीची मानवी चाचणी घेतली जात आहे. या लसीचा पहिला डोस शुक्रवारी (ता.24) दिल्ली येथील एम्स संस्थेत 30 वर्षाच्या स्वयंसेवकाला देण्यात आला. मानवी चाचणीसाठी आयसीएमआर ने देशभरातील निवडक संस्था व हॉस्पीटल्सची निवड केली आहे. त्यात बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पीटलचा समावेश आहे.

वाचा - जावई आला भेटीस अन् गावाला धरलं वेठीस...

दिल्ली येथे या लसीची मानवी चाचणी सुरू झाल्यामुळे बेळगावात चाचणी कधी सुरू होणार? याबाबत उत्सुकता होती. पण आता पुढील आठवड्यात चाचणी होणार हे नक्की झाले आहे. एकदा स्वयंसेवकाला लस दिली की मग त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटी बॉडीजचे परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी आयसीएमआर कडून नियमावली तयार करण्यात आली आहे, त्यानुसार परीक्षण केले जाईल. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांना हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाणार नाही. हॉस्पीटल व स्वयंसेवक यांच्यात नियमित संवाद होईल, आवश्‍यकता भासेल त्यावेळी स्वयंसेवकाला हॉस्पीटलमध्ये बोलावले जाईल व तपासणी केली जाईल. या मानवी चाचणीसाठी कर्नाटकातील एकमेव जीवनरेखा हॉस्पीटलची निवड आयसीएमआरने केली आहे. या हॉस्पीटलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आयसीएमआरच्या माध्यमातून विविध लसींची चाचणी घेतली जात आहे. 

वाचा - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुराप्पा यांना 'या' कारणासाठी न्यायालयाने बजावली नोटीस...

स्वदेशी बनावटीची ही लस 15 ऑगस्ट रोजी उपलब्ध करून दिली जाईल असे आयसीएमआरने जाहीर केले आहे. त्यामुळे या लसीबाबत मोठी उत्सुकता आहे. बेळगावात या लसीची चाचणी होणार असल्याने बेळगावकरांनाही याबाबत मोठी उत्सुकता आहे. बेळगावात आयसीएमआरची शाखा आहे. तेथील प्रयोगशाळेतच स्वॅब तपासणी केली जात आहे. बेळगावात व देशातही कोरोनाबाधीतांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनावरील लस लवकरात लवकर यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोवॅक्‍सीन लस 15 ऑगस्ट रोजी येईल असे सांगण्यात आले असले तरी लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी आता सुरू झाली आहे. 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: human test for covacin will be held in Belgaum next week kolhapur