डिस्टन्सींग न पाळल्याने इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांनीच भरला दंड

पंडित कोंडेकर
Tuesday, 22 September 2020

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजीत केली होती. मात्र तांत्रीक दोष निर्माण झाल्यामुळे ही सभा ऑफ लाईन झाली. यावेळी सोशल डिस्टन्सींग पाळण्यात आले नाही.

इचलकरंजी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजीत केली होती. मात्र तांत्रीक दोष निर्माण झाल्यामुळे ही सभा ऑफ लाईन झाली. यावेळी सोशल डिस्टन्सींग पाळण्यात आले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून सभेला उपस्थीत असलेल्या नगराध्यक्षांसह 45 नगरसेवक-नगरसेविकांना दोनशे रुपये दंडाच्या नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वतः मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनीही दंडात्मक रक्कम पालिकेकडे भरली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल सहा महिन्यानंतर पालिका प्रशासनाने ऑनलाईन सर्वसाधारण सभा 16 सप्टेंबरला आयोजीत केली होती. मात्र या सभेवेळी तांत्रीक त्रुटी निर्माण झाल्यामुळे नाट्यगृहातील एका रुममध्ये सत्तारुढ व विरोधक एकत्र येवून पालिका सभा झाली. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सींगचा पूर्णतः फज्जा उडाला होता. याबाबत सोशल मिडियातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे नगरसेवकांवर प्रशासन कारवाई करणार काय, याकडे लक्ष लागले होते. 

दरम्यान, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सभेला उपस्थित असलेल्या 45 नगरसेवक-नगरसेविकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंडात्मक कारवाईच्या नोटीसा लागू केल्या आहेत. यामध्ये नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्षा तानाजी पोवार, जेष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव, शशांक बावचकर, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे. 

तातडीने दंडाची रक्कम पालिकेकडे जमा  
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी तसेच पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक शशांक बावचकर यांच्यासह काही नगरसेवकांनी तातडीने दंडाची रक्कम पालिकेकडे जमा केली आहे. स्वतः मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनीही दंडात्मक रक्कम पालिकेकडे भरली आहे. 

नगरसेवक मोरबाळे यांचा आक्षेप 
नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. यापूर्वी शहरात अनेक मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे झाले. त्यावेळी सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला होता. त्यांच्यावरही कारवाई होणार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranji's Chief Officer Paid The Fine For Not Following The Distance Kolhapur Marathi News