जून्या घरांसह गोठे, खोपटांना आलयं महत्व

सुनील कोंडुसकर
Wednesday, 20 May 2020

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात गेलेले नागरीक आता गावच्या दिशेने धावत आहेत. परंतु कोरोनामुळे भयभीत झालेले गावकरी, कुटुंबिय आता त्यांचे पहिल्यासारखे स्वागत करू शकत नाहीत. संस्थात्मक अलगीकरणासाठी गावात सार्वजनिक मालकीच्या वास्तू अपुऱ्या पडताहेत.

चंदगड : नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात गेलेले नागरीक आता गावच्या दिशेने धावत आहेत. परंतु कोरोनामुळे भयभीत झालेले गावकरी, कुटुंबिय आता त्यांचे पहिल्यासारखे स्वागत करू शकत नाहीत. संस्थात्मक अलगीकरणासाठी गावात सार्वजनिक मालकीच्या वास्तू अपुऱ्या पडताहेत. या स्थितीत जूनी घरे, जनावरांचे गोठे, चारा ठेवण्यासाठी बांधलेली खोपटे यांना महत्व आले आहे. कोरोनामुळे कुटुंबियांपासून दूर राहण्याचे दुःख असले तरी जून्या आठवणींमुळे मन एका वेगळ्या विश्‍वात रमतय याचे सुख आहे. 

पूर्वी एकाच घरात दोन, तीन कुटुंबं नांदत असत. परंतु एक कुटुंब, एक घर असा नवा विचार रुजायला सुरवात झाली. गेल्या चार दशकात खेड्यांचा चेहरा बदलला आहे. वाढीव वस्ती, शेतवडीत स्वतंत्र घरे उभी राहिली. शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीने नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने शहरे गाठली. वर्षातून ठराविक वेळाच गावाकडे येणे. ज्या गल्लीत बालपण घालवले, शेजाऱ्यांच्या सान्निध्यात वावरलो ते दुरावले. जूने घर, गल्लीकडे दूर्लक्ष झाले. काही सहकारी, वयोवृध्द नागरीक मृत झाले. परंतु कामाच्या व्यापातून त्याचा विचार करण्यास वेळच मिळाला नाही.

कोरोनाने या सर्व स्मृती जागृत केल्या आहेत. शहरातून गावाकडे आलेल्या नागरीकांना कोरंटाईन करणे सक्तीचे आहे. गावातल्या नागरीकांशी संपर्क येऊ नये म्हणून त्यांना शाळा, मंदिर, सहकारी संस्थांच्या इमारतीतून राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु येणाऱ्यांची संख्या पाहता या इमारती कमी पडत आहेत. त्यामुळे जूनी घरे, परसात जनावरांसाठी बांधलेले गोठे तसेच चारा भरण्यासाठी उभारलेली खोपटेसुध्दा वापरात आली आहेत. काहींना शेतातील घरात राहण्याची वेळ आली आहे. कोरंटाईन म्हणजे एक प्रकारची स्थानबध्दता आहे. या सर्वच जागी मनोरंजनाची साधने नाहीत. त्यामुळे गत स्मृतींना उजाळा देणे हेच मनोरंजन ठरत आहे. 

सासरवाडीत प्रवेश निषिध्द..... 
गावगाड्यात अनेक प्रवृत्ती पहायला मिळतात. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर त्याची चर्चा होत असते. नोकरी निमित्त शहरात स्थाईक झालेले काहीजण गावच्या कुटुंबियांशी नाते तोडतात. काहीजण लग्नानंतर आई- वडिलांची जबाबदारी नाकारतात. आपले चौकोनी कुटुंब घेऊन सासरवाडीशी नाते जोडतात. सुट्टीला थेट सासरवाडीतच उतरतात. परंतु कोरोनामुळे सासरवाडीत प्रवेश निषिध्द असल्याने पुन्हा गावच्या वेशीनेच मायेचा हात दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Importance Of Old Houses, Cowsheds Kolhapur Marathi News