esakal | शेतकऱ्यांची वाढली चिंता; दर गुलदस्त्यात ठेवून गळीत हंगाम सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Increased concern of farmers started now crushing season begins


दर घोषणेकडे लक्ष

शेतकऱ्यांची वाढली चिंता; दर गुलदस्त्यात ठेवून गळीत हंगाम सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी  :  गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टी आणि महापुरामुळे नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र आणि उत्पादन घटले आहे. सीमाभागातील बहुतांश साखर कारखान्यांनी दर गुलदस्त्यात ठेवून यंदाच्या गळीत हंगामास प्रारंभ केला आहे.  साखर कारखाने यावर्षी उसाला नेमका किती दर देणार, याकडे  ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
 सीमाभागात सहकारी व खासगी तत्वावर चालणारे २० ते २५ साखर कारखाने आहेत. त्यांनी गत आठवड्यापासून गळीत हंगामास प्रारंभ केला आहे.

कागवाड तालुक्यातील माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शिरगुप्पी शुगर वर्क साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी २७०० रुपये दर घोषीत केला आहे. शेतकरीवर्गानेही कारखान्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र इतर साखर कारखान्यांनी दराबाबत मौन पाळले आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर येथे नुकतीच ऑनलाईन ऊस विकास परिषद झाली आहे. त्यात शेट्टी यांनी एक रकमी एफआरपीबरोबरच अधिक २०० रुपये देण्याची मागणी केली आहे. कारखान्यांनी आपली मागणी मान्य केल्याशिवाय कारखान्यांच्या गोडाऊनमधून साखर बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभुमीवर साखर कारखाने दराबाबत कोणती भूमिका घेणार, हे पहावे लागणार आहे. 


शासनाने वाढत्या महागाईचा विचार करुन ऊस तोड कामगार व वाहतुकदार यांना १४ टक्के वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादकांचाही उत्पादन खर्च वाढला असून त्यांनाही एफआरपी अधिक १४ टक्के वाढ मिळाली पाहिजे. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदीकाठ परिसरातील ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कारखान्यांनी ऊस उत्पादकांना भरीव दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सीमाभागातील काही कारखान्यांनी ठरल्याप्रमाणे एफआरपी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गतवर्षीच्या हंगामातील एफआरपीची रक्कम अजूनही थकीत असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उर्वरीत रक्कम देण्याची मागणी ऊस उत्पादकातून होत आहे.

'यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे कर्नाटक-महाराष्ट्रातील नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा सर्वच साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबड करून उसासाठी तोड देऊ नये. चांगला दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आपला ऊस दिला पाहिजे.'
-राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

'दरवर्षी इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत चांगला दर देण्याचे आश्वासन देऊन साखर कारखाने ऊस नेत आहेत. यावर्षीही सीमाभागातील कारखान्यांनी अशाच प्रकारे वक्तव्य केले आहे. पण यंदा शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने चांगला दर देण्याची गरज आहे.'
-रावसाहेब जनवाडे,ऊस उत्पादक शेतकरी, बेनाडी

संपादन - अर्चना बनगे

go to top