बेळगावकरांना शहरातील किराणा दुकानांची व औषध दुकानांची माहिती ऑनलाईन मिळणार... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या अकराव्या दिवशी बेळगाव महापालिकेने शहरातील किराणा दुकाने व औषध दुकानांची प्रभागनिहाय माहिती देणारे वेबपेज व अँड्रॉईड ऍप्लीकेशन तयार केले आहे.

बेळगाव - लॉकडाऊनच्या अकराव्या दिवशी बेळगाव महापालिकेने शहरातील किराणा दुकाने व औषध दुकानांची प्रभागनिहाय माहिती देणारे वेबपेज व अँड्रॉईड ऍप्लीकेशन तयार केले आहे. महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यानी याची माहिती दिली आहे. बेळगाव शहरात 58 प्रभाग आहेत. या प्रत्येक प्रभागातील किराणा दुकानाचे नाव, दुकान मालकाचे नाव व दुकान कोणत्या परीसरात किंवा उपनगरात आहे याची माहिती देण्यात आली आहे. त्या वेब पेज किंवा ऍप्लीकेशन वरून संबंधित दुकानदाराच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा किंवा व्हॉट्‌स ऍप संदेश पाठविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे लॉक डाऊनच्या काळात महापालिकेचा हा पर्याय नागरीकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. या वेब पेज किंवा ऍप्लीकेशनला भेट दिल्यास प्रभाग क्रमांक व दुकानांचा प्रकार असे दोन पर्याय दिसतात. ज्या प्रभागात आपले वास्तव्य आहे, त्या प्रभागाचा क्रमांक नमूद केल्यानंतर दुकानांच्या पर्यायावर क्‍लीक करता येते. तेथे किराणा दुकान व औषध दुकान असे दोन पर्याय आहेत. त्यापैकी आपल्याला जो हवा आहे तो पर्याय निवडता येईल. त्यामध्ये मग दुकानांचे नाव, दुकानमालकाचे नाव, परीसर व फोन किंवा संदेश पाठविण्याचा पर्याय दिसेल. 

वेब पेजला भेट दिली तर तेथे आधी यासंदर्भातील ऍप्लीकेशन डाऊनलोड करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांना हा पर्याय सर्वात सोपा ठरणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अभिषेक कंग्राळकर यानी यासाठी प्रयत्न केले आहेत. 

महाराष्ट्रातील बेळगाव सीमेवरील ती अकरा गावे केली सील... 

बेळगावात 22 मार्च पासूनच लॉक डाऊन जाहीर झाले आहे. त्यानंतर किराणा माल, औषधे तसेच अन्य जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरात झुंबड उडू लागली. भाजीपाला खरेदीसाठीही झुंबड उडाली. बेळगावच्या एपीएमसी येथे तर गेल्या रविवारी जत्राच भरली. त्यावर उपाय म्हणून फलोत्पादन खात्याच्या वतीने प्रत्येक प्रभागात भाजीपाला नेवून विकण्याची योजना हाती घेण्यात आली. याशिवाय दूध वितरणासाठीही स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. पण किराणा माल, औषधांसाठी नागरीकांना वणवण करावी लागत आहे. त्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना हाती घेतली जावी अशी मागणी होत होती. आता विलंबाने का होईना पण महापालिकेने उपाययोजना हाती घेतली आहे. घरबसल्याना नागरीकांना त्यांच्याच विभागातील किराणा व औषधांच्या दुकानांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. संबंधित दुकानदारांशी संपर्क साधून किराणा किंवा औषधे घरपोच देण्याची विनंतही बेळगावकर करू शकतात. 

या वेबपेजला भेट द्या... 

शहरातील किराणा दुकानांची व औषध दुकानांची घरबसल्या माहिती घेण्यासाठी बेळगावकर http://belagavishops.ttssl.com/user/shops.aspx या वेबपेजला भेट देवू शकतात. या वेबपेजवरच संबंधित अँड्राईड ऍप्लीकेशन डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information about grocery stores and drugstores in Belgaum city will be available online