
कळंबा : 137 वर्ष शहरासह कळंबा, पाचगावला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाचे भूगर्भातील अंतरंग खुले होऊ लागले आहे.
पाणीसाठ्याचा अविभाज्य घटक असणारी तटबंदी, शंभर फूट खोलीची बांधीव विहीर, घडीव दगड, शिसम याच्या मिश्रणामध्ये उभारलेला टॉवर, पाणी पातळी मोजण्याचे दोन दगड, सायफन पद्धतीने पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अशी नावीन्यपूर्ण रचना पाणीपातळी कमी झाल्यामुळे दृष्टीस पडू लागली आहे.
उत्कृष्ट बांधकामाचा अजोड नमुना असलेल्या कळंबा तलावाचे बांधकाम संस्थान काळात झाले. त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्यामुळे बैल जोडी, मजूर, लोखंडी रोलर यांच्या साह्याने तलावाची बांधणी केली. तसेच तटबंदी बांधण्यासाठी पांढरी माती दगड याचा वापर केला आहे, तर तलावाचे मुख्य जलस्तोत्र म्हणून ओळखली जाणारी विहीर पांढरे दगड व चुना यामध्ये बांधली आहे. विहिरीतून पाणी बाहेर जाण्यासाठी दोन दगडी पाट बांधले आहेत. त्याचबरोबर तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा मनोरा घडीव दगड शिसमात बांधलेला आहे. पावसाळ्यात तलाव तुडुंब भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यासाठी तलावाच्या उत्तर बाजूला सांडवा बांधला आहे. पश्चिम बाजूकडे तलावाची 27 फूट पाणी पातळी दर्शवणारे दोन दगड उभे केलेले आहेत. कात्यायनी डोंगरामध्ये पावसाळ्यात पडणारा थेंब न थेंब ओढ्या नाल्याद्वारे सरळ तलावात मिसळेल, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचनेमध्ये कळंबा तलावाचे बांधकाम केल्याचे दिसते. वर्षभर बेसुमार पाणी उपशामुळे तलावाची पाणी पातळी 14 फुटांवर पोचली आहे. त्यामुळे तलावाचे संपूर्ण पात्र कोरडे पडत चालले आहे. त्याचबरोबर तलावाच्या भूगर्भातील बांधकामाची रचना दृष्टीस पडू लागली आहे. दरम्यान, कळंबा तलावाने दोन पिढ्यांची तहान भागवली असून, बारमाही तलावातून पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे त्याचे जतन आणि संवर्धन होणे काळाची गरज आहे.
अंबाबाई मंदिराकडे पाणी नेणारा दगडी पाट
पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी बाबूराव केशव ठाकूर यांची अंबाबाईवर खूप श्रद्धा होती. त्यांनी देवीच्या पूजेसाठी व शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कात्यायनी मंदिर परिसरातील बारमाही वाहणाऱ्या कुंडामधून दगड चुन्याच्या मिश्रणामध्ये बांधलेल्या पाटाद्वारे पाणी वाहून नेले आहे. हा दगडी पाट कळंबा तलावाच्या मध्यभागातून गेलेला आहे. 2016 मध्ये गाळ काढण्याच्या निमित्ताने तलाव कोरडा पडल्यानंतर हा पाट लोकांच्या दृष्टीस पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.