माहिती लपविणे कोरोनाबाधितांना पडणार चांगले महागात 

पंडित कोंडेकर  
सोमवार, 29 जून 2020

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला. परिणामी कोले मळा, नदीवेस नाका परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळले.

इचलकरंजी - कुडचे मळ्यातील कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रशासन हादरले आहे. या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कसा झाला, याचे गुढ अद्यापही कायम आहे. या संसर्गाच्या मूळापर्यंत जाण्याचा शोध प्रशासन करीत आहे. यासाठी मोबाईल कॉल डिटेलच्या माध्यमातून बाधीत रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास तपासण्यात येत आहे. 

राज्यातील अन्य वस्त्रोद्योग केंद्रामध्ये कोरोनाचा कहर पहावयास मिळाला आहे. पण इचलकरंजीत सुरुवातीपासून कडक लॉकडाउन पाळण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला. परिणामी कोले मळा, नदीवेस नाका परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळले. पण यातून समूह संसर्ग झाला नाही. या दोन्ही रुग्णांना कोठून संसर्ग झाला, याचा ठोस शोध शेवटपर्यंत प्रशासनाला घेता आला नाही. केवळ शक्‍यता वर्तवण्यात आली. सोलापूरहून आलेल्या तिघांना व त्यांच्यापासून एका स्थानिकाला संसर्ग झाला. पण त्याचे फारसे गांभिर्य कोणालाच वाटले नाही. पण कुडचे मळ्यातील कोरोनाच्या उद्रेकामुळे मात्र इचलकरंजी हबकली आहे. 

कुडचे मळ्यातील एका यंत्रमाग कारखान्यातील कोरोना संसर्गाला सुरुवात झाली. पाहता पाहता समुह संसर्ग होत गेला. कुडचे मळ्यासह काडापूरे तळ, बाळनगर, जूना चंदूर रोड, संग्राम चौक आदी विस्तृत परिसर प्रतिबंधित क्षेत्राखाली आला आहे.

कर्नाटकातील बोरगांवपर्यंत त्याचा प्रसार झाला आहे. मुळ संसर्ग कोणापासून झाला, याचा नेमका सोर्स अद्याप सापडलेला नाही. सुरुवातीला सोलापूर कनेक्‍शनची चर्चा होती. काहीजण लग्नाच्या निमित्ताने सोलापूरला जावून आल्याची चर्चा आहे. नंतर पूणे कनेक्‍शनबाबत संशय वाढला. यंत्रमाग कारखानदाराचा मुलगा हा पुण्याहून आल्याचे सांगण्यात आले. पण त्यामुळे संसर्ग झाल्याच्या ठोस निर्णयाप्रत प्रशासन आलेले नाही. आता मूळ सोर्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही बाधीत रुग्णांच्या मोबाईल कॉलच्या डिटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. यातून प्रवासाचा इतिहास तपासला जाणार आहे. सध्या याबाबत कोणीही ठोस माहिती देत नसल्यामुळे प्रशासनाने या माध्यमातून सोर्स शोधण्यास सुरुवात केली आहे. तुर्तास तरी कुडचे मळ्यातील संसर्गाचा नेमका सोर्स कोण, हे अद्याप तरी गुढ बनले आहे. 

हे पण वाचा - फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची ‘हसीन’स्वप्ने; वाचा, कोणी केली टीका? ​

दिशाभूल महागात पडणार 
शहरातील अनेक नागरिक आपल्या प्रवासाबाबत माहिती सांगण्यास टाळाटाळ करीत आहेत. काहीजण कोठून प्रवास करून आलो आहोत याचीही माहिती लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रशासनाने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून मुळापर्यंत पोचल्यास अशी खोटी माहिती सांगणाऱ्यांना पुढील काळात अनेक कारवाईना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे दिशाभूलचा प्रयत्नही महागात पडणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: investigation of call details of corona positive patient in kolhapur ichalkaranji