पावसाची हुलकावणी त्यात उभे ठाकले नवे संकट...आजरा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे जगणं मुश्‍कील

रणजित कालेकर
Wednesday, 29 July 2020

गेले एक तपापासून जंगली हत्तीपासून या तालुक्‍यात उपद्रव सुरू आहे. या काही वर्षात आजरा तालुक्‍यात हत्तींचे कळप अनेकदा आले आहेत. पण टस्करांनी येथे कायमचा मुक्काम ठोकला आहे.

आजरा : तालुक्‍यात गेले पंधरा दिवस पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. हे एकीकडील चित्र असताना दुसरीकडे तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात दोन जंगली हत्तींचा (टस्कर) धुमाकूळ सुरू आहे. ते शेतातील उभी पिके फस्त करण्याबरोबर तुडवून नष्ट करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे जगणं मुश्‍कील झाले आहे. त्यांना आवरावयाचे कसे या विवंचनेने वनविभाग हतबल झाला आहे. 

गेले एक तपापासून जंगली हत्तीपासून या तालुक्‍यात उपद्रव सुरू आहे. या काही वर्षात तालुक्‍यात हत्तींचे कळप अनेकदा आले आहेत. पण टस्करांनी येथे कायमचा मुक्काम ठोकला आहे. ते तळ हलवण्यास तयार नाहीत. उपलब्ध होणारे भरपूर खाद्य, पोहण्यासाठी तुडुंब असलेले पाटबंधारे प्रकल्प, राहण्यासाठी दाट जंगल यामुळे येथील चाळोबाच्या जंगलात त्यांची राहूटी आहे. ते या परिसरालगतच्या अनेक गावात धुमाकूळ घालत असून दरवर्षी ऊस, भात, बांबू, नारळ यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत.

आजपर्यंत सुमारे दीड कोटी रुपयांच्या नुकासान जंगली हत्तीनी केले आहेत. सुमारे 32 गावांतील शेतीचे नुकसान झाले आहे. जंगली हत्तीना तालुक्‍यातून हुसकावून देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी व वनविभागाने "एलिफंन्ट गो बॅक' मोहीम राबविली. हत्ती तज्ज्ञांना पाचारण करून विविध उपाययोजना केल्या. हत्ती शेतात उतरू नयेत म्हणून जंगलालगत चर मारले; पण कोणत्याही उपाय योजनेला आतापर्यंत यश आले नाही.

सौर कुंपन यांसह अन्य काही उपायांची चर्चा झाली पण प्रत्यक्षात ते आले नाही. मध्यंतरी हत्तींना पकडण्यासाठी केरळ, कर्नाटक परिसरातून पथक आणण्याबाबत चर्चा सुरू होत्या. त्याबाबत प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. पण त्याबाबत पुढे हालचाली होतांना दिसत नाही. सध्या पावसाने तालुक्‍यात हुलकावणी दिली आहे. पाण्याअभावी पीक करपत आहेत. भात व उसावर रोग पडत आहेत. यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला हत्तीच्या संकटाने घेरले आहे. यातून मार्ग कसा काढावा हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. 

वनविभागाचे अवघड जागचे दुखणे....! 
वनविभागाकडे हत्ती हुसकावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व कर्मचाऱ्यांना हत्तीबाबत प्रशिक्षण दिलेले नाही. वनमजुरांची कमतरतेबरोबर ते निवृत्तीकडे झुकले आहेत. त्यामुळे हत्तींना जंगलातच रोखण्याबाबत अडचणी आहेत. मध्यंतरी या विभागाने हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल कॅम्प जंगलात उभारले होते, पण निधी अभावी बंद आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It Is Difficult For The Farmers Of Ajra Taluka To Survive Kolhapur Marathi News