esakal | जैसलमेर ते सीपीआर व्हाया गुजरात...!
sakal

बोलून बातमी शोधा

जैसलमेर ते सीपीआर व्हाया गुजरात...!

तीर्थयात्रेसाठी दोन महिन्यांपूर्वी इराणला गेलेल्या यात्रेकरूंची अवस्था "आगीतून फुफाट्यात' अशी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी रात्री दहा वाजता ते जैसलमेर (राजस्थान) येथून निघाले. तत्पूर्वी त्यांची तपासणी झाली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दोन गाड्यांतून प्रत्येकी पाच या प्रमाणे दहा प्रवासी महाराष्ट्राच्या दिशेने निघाले.

जैसलमेर ते सीपीआर व्हाया गुजरात...!

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर ः ते आले, सीपीआरला गेले आणि पुन्हा क्वॉरंटाईन झाले, अशी अवस्था जैसलमेरहून आलेल्या त्या चार प्रवाशांची झाली आहे. जैसलमेर ते कोल्हापूरपर्यंतचा त्यांचा प्रवास सुखाचा झाला. यातील एकाच्या घरी साहित्य उतरविण्यात आले. तेथून सीपीआरला ते गेले आणि जाळ्यात सापडले. शनिवारी सायंकाळी यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

तीर्थयात्रेसाठी दोन महिन्यांपूर्वी इराणला गेलेल्या यात्रेकरूंची अवस्था "आगीतून फुफाट्यात' अशी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी रात्री दहा वाजता ते जैसलमेर (राजस्थान) येथून निघाले. तत्पूर्वी त्यांची तपासणी झाली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दोन गाड्यांतून प्रत्येकी पाच या प्रमाणे दहा प्रवासी महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. सूरत, बडोदा बायपासद्वारे ते महाराष्ट्रात दाखल झाले. ठाणे, नवी मुंबई अशा प्रत्येक ठिकाणी रिपोर्ट दाखवत त्यांचा कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. यातील एक गाडी राज्याच्या अन्य जिल्ह्यात गेली. 
दुसऱ्या गाडीचा प्रवास कोल्हापूरच्या दिशेने सुरू झाला. सांगली-इस्लामपूर येथे एक भाविक उतरला. त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला गेला. उर्वरित चौघेजण किणी टोल नाक्‍यावर आले. तेथेही रिपोर्ट दाखविले गेले. यातील एक जण लिशा हॉटेल परिसरात असलेल्या घरी गेला. तेथे साहित्य उतरून हे चौघेजण शनिवारी सीपीआरमध्ये गेले. इराणनंतर जैसलमेर आणि कोल्हापूर असा प्रवास झाल्याने सीपीआरच्या स्तरावर खबरदारी घेतली गेली. होम क्वारंटाईनची मागणी सुरवातीच्या टप्प्यात नाकारली गेली. सायंकाळी चौघांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याच रुग्णाचा जैसलमेर येथे 11 तसेच 12 एप्रिलचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 
एका गाडीतून पाच जण जातील, असा नियम घालण्यात आला. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घरी परतण्याची त्यांची आशा निर्माण झाली होती. मात्र, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा सरकारी रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. कोल्हापुरातील अजूनही दहा जण जैसलमेर मुक्कामी आहेत. 

राजस्थानात 42 दिवस 
इराणला गेलेल्या यात्रेकरूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इराणहून त्यांची लवकर सुटका होत नव्हती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. इराणमध्ये 25 दिवसांच्या मुक्‍कामानंतर 44 जण दिल्लीत विमानाने आले. तेथून त्यांना जैसलमेर येथे लष्कराच्या नियंत्रणाखाली ठेवले गेले.