esakal | जयसिंगपूरवासीय "फिट अँड फाईन'
sakal

बोलून बातमी शोधा

Jaysingpur Resident "Fit and Fine" Kolhapur Marathi News

प्रदूषणमुक्त हवा, पाणी आणि फिटनेसकडे विशेष लक्ष यामुळे जयसिंगपूरकरांचे आरोग्य "फिट ऍण्ड फाईन' असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयसिंगपूरवासीय "फिट अँड फाईन'

sakal_logo
By
गणेश शिंदे

जयसिंगपूर : प्रदूषणमुक्त हवा, पाणी आणि फिटनेसकडे विशेष लक्ष यामुळे जयसिंगपूरकरांचे आरोग्य "फिट ऍण्ड फाईन' असल्याचे स्पष्ट झाले आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या सर्वेक्षण मोहिमेतून शहरातील 58 हजारांपैकी केवळ दोन हजार 419 नागरिक व्याधीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रमाण केवळ 4.48 टक्के आहे. यातही खास करून ज्येष्ठ मंडळी मधुमेहाने बेजार झाल्याचेही सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. मधुमेह, ब्लडप्रेशर, किडनी, कॅन्सरच्या आजारासह अन्य व्याधींनी ही मंडळी त्रस्त आहेत. 

शहराच्या एका बाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहती, कृष्णेतून पाणी उपसा केला जात असला तरी वारणेच्या प्रवाहाच्या पाण्याचा नैसर्गिक उपसा केला जातो. कृष्णेच्या तुलनेत हे पाणी कमी प्रदूषित असल्याने जयसिंगपूरचे पाणी स्वच्छ असल्याचा बोलबाला परिसरात आहे. शहरातील कोणत्याही भागात फेरफटका मारला तरी प्रत्येकाच्या अंगणात असणारी वृक्षसंपदा हेही शहराच्या सदृढ प्रकृतीत एक महत्त्वाचा भाग आहे. उद्योगपती संजय घोडावत यांनीही शहराच्या वृक्षसंपदेत भर घातली. 

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' सर्वेक्षणातून शहरातील घराघरांत आणि प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती घेतली. यात शहराचे आरोग्य एकदम तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदूषणमुक्त जयसिंगपूरमधील नागरिकांचे आरोग्याकडेही खास लक्ष असते, हेही या सर्वेक्षणातील अहवालातून स्पष्ट झाले. 

फास्ट फूडकडे पाठ 
शहरात अनेक ठिकाणी फास्ट फूड विक्री केली जात असली तरी नागरिकांकडून फास्ट फूड, जंक फूडकडे पाठ फिरवली जाते. हेही एक प्रमुख कारण शहराच्या आरोग्यासाठी असू शकते. 

निसर्गप्रेमी जयसिंगपूर 
शहराच्या सर्वच भागांना वृक्षसंपदेची झालर आहे. शहरातील सेवाभावी संस्था, उद्योगपती, नगरसेवकांकडून सातत्याने वृक्षारोपण केले जाते. यातील बहुतांश वृक्ष मूळ धरतात. त्यामुळे शहर निसर्गप्रेमी असल्याची ओळख आहे. 

व्याधीचे प्रमाण अत्यल्प
माझे कुटुंब, माझी जबाबदारी' सर्वेक्षणातून शहरातील दोन हजार 419 नागरिकांना विविध व्याधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात व्याधीचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रदूषणमुक्त हवा, पाणी, आरोग्याबाबतची जागरूकता ही कारणे यामागील आहेत. दोन हजार 419 पैकी बहुतांश व्याधीग्रस्त हे ज्येष्ठ नागरिक आहेत. 
- डॉ. पांडुरंग खटावकर, 
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जयसिंगपूर

संपादन - सचिन चराटी