दहावीची परिक्षा होणार... पण 'या' नऊ नियमांची मार्गसूचीचे काटेकोरपणे करावे लागणार पालन...

मिलिंद देसाई
शनिवार, 30 मे 2020

शिक्षण खात्याने दहावीची परीक्षा होणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता परीक्षा आणि परीक्षा केंद्राचे स्वरुप कसे असेल, याची उत्सुकता विद्यार्थी व पालकांत आहे.

बेळगाव - शिक्षण खात्याची मार्गसूची, परीक्षार्थींना सुरक्षेची हमी गेल्या दोन महिन्यापांसून कोरोनाबरोबरच सर्वाधिक चर्चा आहे, ती दहावीच्या परीक्षेची. परंतु, शिक्षण खात्याने दहावीची परीक्षा होणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता परीक्षा आणि परीक्षा केंद्राचे स्वरुप कसे असेल, याची उत्सुकता विद्यार्थी व पालकांत आहे. परीक्षा काळात सोशल डिस्टन्स राखण्याबरोबरच परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी शिक्षण खात्याने नऊ नियमांची मार्गसूची जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर या नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

शाळेत क्‍वारंटाईन केंद्र नको

ज्या शाळेत दहावीची परीक्षा केंद्रे आहेत, त्या शाळांमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांना क्‍वारंटाईन करण्यास शिक्षण खात्याने मनाई केली आहे. ज्या वसती शाळांमध्ये परीक्षा केंद्र आहेत, तेथे क्‍वॉरटाईन केलेल्या नागरिकांची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी क्‍वॉरटाईन करु नये, अशी सूचना शिक्षण खात्याने केली आहे. त्यानुसार परीक्षा केंद्रे असलेल्या वसती शाळांमधील क्‍वारंटाईन केंद्रे अन्यत्र हलविली आहेत.

केंद्राचे होणार निर्जंतुकीकरण

परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर परीक्षा केंद्रावर स्वच्छतेची कामे हाती घेतली जातील. सर्व वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात विद्यार्थी, पालक किंवा कोणालाही गर्दी करुन थांबता येणार नाही. सर्व परीक्षा केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

दोन खोल्या राखीव

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर राखून बसावे लागणार आहे. वर्गात सामाजिक अंतर ठेवण्यास अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन खोल्या राखीव ठेवल्या जाणार आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील परीक्षा केंद्राची संख्या वाढविली असून 104 परीक्षा केंद्रांसह 20 उपकेंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.

थर्मल स्कॅनिंग होणार

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर उपस्थित रहावे लागणार आहे. सकाळी 10.30 वाजता पेपरला सुरुवात होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना 9.30 वाजताच परीक्षा केंद्रावर हजर रहावे लागेल. पालकांना शाळेच्या प्रवेशव्दाराच्या आत येण्याची परवानगी नसून शिक्षण खात्याच्या मार्गसूचीबाबत जागृती करण्याची सूचना शिक्षकांना केली आहे.

आरोग्य खातेही कार्यरत

परीक्षा काळात सर्व केंद्रावर आरोग्य खाते व पॅरा मेडिकलच्या परिचारिकांची नेमणूक केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे व सॅनिटाईज करण्याची जबाबदारीही त्यांना दिली जाईल. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून आल्यास त्यांना स्वतंत्र खोलीत बसून परीक्षा द्यावी लागणार आहे.

मास्क वापरणे बंधनकारक

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असून परीक्षार्थींना मास्क उपलब्ध करुन देण्यासाठी भारत स्काऊट आणि गाईड्‌सने पुढाकार घेतला आहे. यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्हातील 30 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा काळात पर्यवेक्षकांवरील भार कमी करण्यासाठी पर्यवेक्षकांची संख्या वाढविली जाणार आहे.
 

शिक्षण खात्याने दहावी परीक्षेची तयारी करण्याची सूचना केली आहे. तसेच जाहीर केलेल्या मार्गसूचीबाबतही माहिती दिली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्‍यक त्या वस्तूंची पूर्तता केली जाईल.
- एम. जी. बेळण्णावर, शिक्षणाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnataka education department has announced a nine rule roadmap for all examination centers