उंच डोंगर, विस्तीर्ण दऱ्या, चिंब झिम्माड पाऊस तरीही 'हा' परिसर वाटतोय सुना-सुना..

सुनील कोंडुसकर
Friday, 17 July 2020

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोकणच्या हद्दीला लागून असलेला हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी त्याचे सौंदर्य आणखी वाढवले. पावसाळ्याच्या दिवसांत तिलारीच्या घाटातून प्रवास करताना हे सौंदर्य शतपटीने भावते.

चंदगड : कोदाळी-तिलारीनगरचा परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याचा अद्‌भुत नमुना. उंच डोंगर, खोल आणि विस्तीर्ण दऱ्या, घनदाट जंगल, पशु-पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याला वाहत्या निर्झराचे संगीत. डोंगराच्या टोकावर धो-धो पडणारा पाऊस फेसाळता धबधबा होऊन कोसळू लागतो. त्यावेळी अवघा परिसर त्या आवाजाने धीरगंभीर भासतो. पावसाने संपूर्ण वातावरण चिंब झिम्माड झालेले. जिकडे पाहावे तिकडे हिरवाईची मखमली चादर पसरलेली. सध्या तिलारीच्या घाटात पावसाने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, कोरोनामुळे पर्यटनस्थळे बंद असल्याने या वर्षी पर्यटकांना ही अनुभूती घेता येत नसल्याची खंत आहे. 

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोकणच्या हद्दीला लागून असलेला हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी त्याचे सौंदर्य आणखी वाढवले. पावसाळ्याच्या दिवसांत तिलारीच्या घाटातून प्रवास करताना हे सौंदर्य शतपटीने भावते. प्रत्येक नागमोडी वळणावर निसर्गाचे एक नवे रूप पाहायला मिळते. एकापाठोपाठ दूरवर डोंगरांची रांग नजरेच्या टप्प्यात येत असताना विस्तीर्ण दरीचा आवाका मात्र नजरेत सामावत नाही.

आभाळ फाटल्यासारखा टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडायला लागला, की अंगावर काटा उभा राहतो. त्याचवेळी खोल दरीवर धुक्‍याचे साम्राज्य पसरते. अगदी आपला प्रवास ढगातून चालल्यासारखे भासते. परंतु, काही क्षणच धुक्‍याचे ढग हवेच्या वेगाने बाजूला सरकतात आणि पुन्हा खोल दरीतील झाडे-झडोरा दिसायला लागतो. घाटाच्या माथ्यावर उभे राहून तिलारीचा विराट जलाशय पाहताना मन अचंबित होते. रावतोबा पॉइंट, पॉप्युलर धबधबा, स्वप्नवेल पॉइंट, तिलारी जलविद्युत प्रकल्प, शीर्षखणी धरण, मुख्य धरण यासारखे कितीतरी सुंदर पॉइंट पावसाळ्याचा नवा साज लेऊन नटले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटकांनी बहरणारा हा परिसर या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुना-सुनाच आहे. 

हॉटेल व्यवसायाला जबर फटका
दरवर्षी जूनपासून इथले पावसाळी पर्यटन सुरू व्हायचे. यंदा जुलै संपत आला तरी पर्यटन बंदच आहे. पुढेही ते कधी सुरू होईल, याची खात्री नाही. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या हॉटेल व्यवसायाला त्याचा जबर फटका बसला आहे. 
- अंकुश गावडे, हॉटेल मालक, कोदाळी 
 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Kodali-Tilarinagar Area Is Deserted Without Tourists Kolhapur Marathi News