esakal | कोल्हापूर जिल्हा समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर... "या' मंत्र्यांनी व्यक्त केली भिती
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur District Corona Group On The Verge Of Infection Kolhapur Marathi News

कोरोना रुग्णाला बहिष्कृत करणे, त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणे ही परिस्थिती बदलायला हवी. लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ उपचारासाठी आल्यास कुटुंबासह शेजाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणे शक्‍य आहे

कोल्हापूर जिल्हा समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर... "या' मंत्र्यांनी व्यक्त केली भिती

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : जिल्हा आता समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. लॉकडाऊन किती वेळा करायचा हा प्रश्‍न आहे. कोरोनाला सोबत घेऊनच दैनंदिन व्यवहार करावे लागणार आहेत. लक्षणे दिसल्यानंतर तत्काळ उपचाराला जाणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टी तंतोतंत पाळल्या पाहिजेत. मास्क कोरोनावरील औषधच आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केले. 

येथील पंचायत समितीच्या शाहू सभागृहात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार राजेश पाटील, नगराध्यक्षा स्वाती कोरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""कोरोना रुग्णाला बहिष्कृत करणे, त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणे ही परिस्थिती बदलायला हवी. लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ उपचारासाठी आल्यास कुटुंबासह शेजाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणे शक्‍य आहे. तसे प्रयोग सुरूही झालेत. धारावी आणि दिल्लीच्या धर्तीवर नागरिकांचे स्क्रिनिंग करून ताप व ऑक्‍सिजन मोजणे एकमेव पर्याय आहे.

कागल मतदारसंघात ताप व ऑक्‍सिजन मोजण्याचे मशिन्स दिले आहेत. नगरपालिका क्षेत्र व गावागावात स्क्रिनिगचे काम सुरू आहे. ताप असलेल्यांना बाजूला करून त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे होत आहे. यामुळे समाज सुरक्षित राहण्यास मदत होत आहे. आपल्यातील प्रतिकार शक्तीवर कोरोनाची तीव्रता ठरलेली असते. बंगल्यात आणि सुखात नांदणाऱ्यांपेक्षा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची प्रतिकार शक्ती अधिक असल्याचा निष्कर्ष मुंबईत पुढे आला आहे.'' 

गडहिंग्लजला कोवीड शववाहिका 
नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मृतदेह नेण्यास पालिकेला शववाहिकेची गरज असल्याचे सांगितले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा नियोजन अधिकारी श्री. यादव यांना संपर्क करीत आमदार फंडातून शववाहिकेसाठी निधी मंजूर करण्याची सूचना केली. एक-दोन दिवसात ही शववाहिका उपलब्ध होणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. 
 

संपादन - सचिन चराटी

go to top