कोल्हापुरकरांच्या गाड्यांचा नादच खुळा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ का म्हणतात तर येथे जे मनाला येईल ते करण्यात धन्यता मानली जाते. एखाद्या मित्राला टोपण नावाने बोलवणे, खास कोल्हापुरी भाषेत हाक मारणे, रांगड्या भाषेत ‘स’चा सूर ओढणे हे कोल्हापूरचं वेगळंपण आहे.

कोल्हापूर - कोल्हापूरकर किती शौकीन आहेत, याचा अंदाज येथे असलेल्या किमती दुचाकीवरून येतो. तब्बल पंधरा लाखांपर्यंतच्या दुचाकी कोल्हापुरात रजिस्ट्रेशन झाल्या आहेत. पाच लाखांहून अधिक किंमत असलेल्या एकूण ३४ दुचाकी कोल्हापुरात रजिस्ट्रेशन झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आहे. यामध्ये कावासाकी मोटर्स कंपनीच्या दुचाकी अधिक असल्याचे दिसून येते.

‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ का म्हणतात तर येथे जे मनाला येईल ते करण्यात धन्यता मानली जाते. एखाद्या मित्राला टोपण नावाने बोलवणे, खास कोल्हापुरी भाषेत हाक मारणे, रांगड्या भाषेत ‘स’चा सूर ओढणे हे कोल्हापूरचं वेगळंपण आहे. या पलीकडे जाऊन शौकिनांचे वेगळेच जग आहे. येथे मोटारींच्या फॅन्सी क्रमांकावर ती कोणाच्या मालकीची आहे, हे ओळखले जाते. नेत्यांनी, उद्योजकांनी त्यांच्या मोटारींचे क्रमांक म्हणजे त्यांची ओळख निर्माण केली आहे. मोटारींच्या किमती कोटीत असल्याचेही सांगण्यात येते; मात्र हीच क्रेझ आता दुचाकीमध्येही दिसू लागली आहे. नुकताच परदेशातून दहा लाखांच्या चार दुचाकी देशात आल्या. त्या सर्व महाराष्ट्रात आल्या. पैकी दोन कोल्हापुरात दाखल झाल्या. यावरूनच कोल्हापूरकर किती शौकीन आहेत, हे दिसून येते. 

वाचा - म्हणुन तो करतो एमसीसीच्या विद्यार्थ्यांचे मोफत केस कटिंग...

ॲडव्हान्स सर्च व्हेईकलमध्येही कोल्हापूर कमी नाही. परदेशी बनावटीच्या दुचाकी केवळ शौक म्हणून खरेदी केल्या जातात. तब्बल १४ लाख ८७ हजार १५० रुपयांची थंडरब्रीड स्टॉर्म ए-१ ही दुचाकीसुद्धा इचलकरंजीत आहे. १३ लाख ८१ हजार १६९ रुपये किमतीची पनिगा एलई ९५९ (आयएमपी) ही महागडी आणि वेगळ्या लूकची दुचाकी कोल्हापुरातील नागाळा पार्कात आहे. जानेवारी २०१७ मध्ये ती खरेदी केली आहे. तसेच १२ लाख, ११ लाख, सात लाख, इथंपर्यंतच्या दुचाकी कोल्हापूर जिल्ह्यात रजिस्ट्रेशन झाल्या आहेत. बहुतांशी दुचाकी या कावासाकी कंपनीच्या आहेत. स्पोर्टस्‌ बाईकमध्ये ही मॉडेल आहेत.

कोल्हापुरात दहा लाखांहून अधिक किमतीच्या दुचाकी आहेत. कोल्हापुरातील शौकिनांकडून या दुचाकी खरेदी केल्या जात आहेत. पाच ते पंधरा लाखांपर्यंत दुचाकीच्या किमती आहेत. परदेशी बनावटीच्या दुचाकीसुद्धा कोल्हापूर परिवहन कार्यालयात नोंद झाली आहे. या दुचाकी रजिस्ट्रेशनसाठी आल्यानंतर त्या पाहण्यासाठी कार्यालयात गर्दी होते.
- डॉ. स्टिव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Up to lakhs of bike registrations have taken place in Kolhapur