esakal | दिवाळीत बेळगावात प्रदूषण घटले, फटाके बंदीचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

less noise pollution diwali two years belgaum

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा देशातील काही राज्यांनी फटाक्‍यांवर बंदी घातली.

दिवाळीत बेळगावात प्रदूषण घटले, फटाके बंदीचा परिणाम

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव - फटाक्‍यांवर घातलेल्या बंदीचे सकारात्मक परीणाम यंदा बेळगावात पहावयास मिळाले आहेत. यंदा दिवाळी सणाच्या काळात ध्वनी व वायूप्रदूषणात वाढ झाली नाही असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणने आहे. 

मंडळाने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजीची ध्वनी व वायू प्रदूषणाची पातळी आणि 14 ते 16 नोव्हेंबर या काळातील प्रदूषणाची पातळी तपासली. त्यावेळी ही बाब मंडळाच्या निदर्शनास आली. 14 नोव्हेंबर रोजी बेळगावात लक्ष्मीपूजन झाले. त्यादिवशी ध्वनी व वायू प्रदूषणाच्या पातळीत थोडी वाढ झाल्याचेही मंडळाचे म्हणने आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हणजे बलीप्रतिपदेलाही प्रदूषणात काही प्रमाणात वाढ झाली. पण गतवर्षी किंवा त्याआधी दिवाळी सणात जेवढे ध्वनी व वायू प्रदूषण झाले होते, तेवढे यंदा झाले नाही असे बेळगावचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी गोपाळकृष्ण संतनगी यांचे म्हणने आहे. अर्थात यंदा संपूर्ण कर्नाटकात दिवाळी सणात प्रदूषण कमी झाल्याचा राज्य शासनाचा दावा आहे. बेळगाव शहरही त्याला अपवाद नाही. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा देशातील काही राज्यांनी फटाक्‍यांवर बंदी घातली. कर्नाटकानेही त्याचे अनुकरण केले व बंदी जाहीर केली. पण या बंदीच्या विरोधात काहींनी आवाज उठविला. त्यामुळे मग हरीत फटाके वाजविण्याची मुभा दिली. पण दिवाळी सणात हरीत फटाके उपलब्ध करून देणे प्रशासनाला व विक्रेत्यांनाही शक्‍य झाले नाही. त्यामुळे बंदी असूनही काहींनी फटाके वाजविले. पण आधीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण खूपच कमी होते. बेळगावात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जातात, आतषबाजी केली जाते. शहराच्या मुख्य बाजारपेठेत हे चित्र पहावयास मिळते. पण यंदा अपवाद वगळता बहुतेक सर्व व्यापाऱ्यांनी फटाके न वाजविताच लक्ष्मीपूजन केले. फटाके वाजविल्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषणही होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर्षी दिवाळीच्या आधी व दिवाळी सणात या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणाची पातळी तपासण्याचा निर्णय घेतला. ऑटोनगर येथील मंडळाच्या कार्यालयात तशी यंत्रणा उपलब्ध आहे. त्यातून प्रदूषणाची नेमकी स्थिती समजली. त्याचा अहवाल मंडळाने बंगळूरला मुख्यालयाकडे पाठविला आहे.

हे पण वाचा ‘महावितरण’लाच धक्का देणारा मृत्यू

मंडळाने 9 नोव्हेंबर रोजीची ध्वनीप्रदूषणाची पातळी तपासली होती, त्यावेळी ती 52.48 डेसीबल इतकी होती. 14 नोव्हेंबर रोजी ही पातळी 64.3 डेसीबल झाली. 15 रोजी 58.4 डेसीबल व 16 रोजी 60.2 डेसीबल इतकी होती. वायू प्रदूषणाबाबतही असेच झाले आहे. 10 नोव्हेंबर व दिवाळी सणात म्हणजे 14, 15 व 16 नोव्हेंबर रोजीची वायू प्रदूषणाची पातळी तपासली असता, सणात वायू प्रदूषणात किंचित वाढ झाल्याचे दिसते. या तिन्ही दिवशी दुपारी 2 ते रात्री 10 यावेळेत प्रदूषणाचे प्रमाण जास्त होते. 


संपादन - धनाजी सुर्वे 

go to top