आम्हाला काय होतंय, हा भ्रम सोडा 

आम्हाला काय होतंय, हा भ्रम सोडा 
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेले 14 रुग्ण सापडले. आज यातील एकाचा मृत्यू झाला. हे खरे असले तरी या 14 पैकी 13 जण बाहेरून कोल्हापुरात येताना आपल्या सोबत कोरोना संसर्गाला घेऊन आले असल्याचे वास्तव आहे. याचा अर्थ जिल्ह्यातल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरवात नक्की झालेली नाही. या क्षणीही कोरोना संसर्गाचे मूळ कोल्हापुरात नाही. पण, म्हणून लॉकडाउन उठल्यासारखेच बहुतेक जण वावरत आपण पूर्ण सुरक्षित आहोत, असे मानू लागलो तर मात्र भविष्याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि बहुतेक कोल्हापूरकर अजूनही "आम्हाला काय होत नाही' याच भ्रमात आहेत. 
जिल्ह्यात आज रात्रीपर्यंत कोरोनाचे 14 रुग्ण आढळले. त्यातील सहा पूर्ण बरे झाले. म्हणजे सात जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाचा मृत्यू झाला. या 14 रुग्णांच्या संसर्गाचा प्रवास पाहिला तर तो बाहेरून सुरू झालेला आहे. भक्तिपूजानगरमधील पहिला रुग्ण पुण्याहून महालक्ष्मी एक्‍स्प्रेसने कोल्हापुरात बहिणीकडे आला. येताना रेल्वेतून संसर्ग घेऊन आला. बहिणीच्या घरात तो राहिल्याने बहिणीला संसर्ग झाला. पेठवडगावची महिला इस्लामपूरला कोरोना संसर्ग झालेल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन आली. व येताना स्वतःच संसर्गित झाली. उचत (ता. शाहूवाडी) येथील तरुण तर तबलिकमधून येऊनही बिनधास्त फिरत राहिला. त्याच्यामुळे त्याचा भाऊ व आईलाही संसर्ग झाला. कसबा बावड्यातील महिलाही नातेवाईकांच्या मृत्यू सांत्वनासाठी मुंबईला गेली होती. तिला तेथेच संसर्ग झाला. मुंबईत कंटेनरमधून तिघे आले. कोल्हापुरात त्यांना पकडले आणि कंटेनरमधून संसर्ग घेऊनच ते खाली उतरले. नागाळा पार्कातील तरुण तर इराण, इराक, तेहरान, जैसलमेर, भोजपूर असे करीत आला. आणि कोल्हापुरात आल्यावर पॉझिटिव्ह आढळला. भुदरगड तालुक्‍यातला, काल रात्री बांबवडे येथे सापडलेला व आज शिये नाक्‍यावर सापडलेला कनाननगरचा तरुण हे सारे बाहेरून येतानाच सोबत संसर्ग घेऊन आले आहेत. 
अर्थात, बाहेर कोरोनाचा संसर्ग घोंगावत असताना कोल्हापुरात त्याचे उगमस्थान आतापर्यंत नक्की नाही. पण, काही कोल्हापूरकरांचे लॉकडाउनच्या काळातले वर्तन पाहता कोरोनाचा संसर्ग आणखी वाढला तर त्यात आश्‍चर्य नाही. कारण आज दुपारी शहरातील रस्त्यावरील बॅरिकेटिंग काढण्यास सुरवात झाली. आणि "आता लॉकडाउन उठला' अशा आशयाच्या संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली. जणू काही आता मोकळे फिरायला खुली संधी मिळाली, अशीच भावना निर्माण झाली. 
पण, येथून पुढे आताच खरी परीक्षा आहे. कोरोनाचा थेट संसर्ग कोल्हापुरातून नाही. या समाधानात सगळे वावरत राहिले तर भविष्यात फार मोठा धोका नक्की आहे. अजूनही कोल्हापूरकरांनी दक्ष राहण्याची गरज आहे. रस्त्यावरील बॅरिकेटिंग काढले म्हणजे आपण कोरोनामुक्त झालो, अशा भ्रमात असणाऱ्यांना घरातच रोखण्याची गरज आहे. 

लॉकडाउन पोलिस बळावर जरुर राबविता येईल. पण, लोकांत स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. पोलिसाला चकविण्यात काही जण धन्यता मानत असतील पण सर्वांनी लॉकडाउन पाळणे काळाची गरज आहे. आता तर परराज्यांतून लोक येण्या-जाण्यास सुरवात होईल. त्यामुळे अशा लोकांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे. 
- सतेज पाटील, पालकमंत्री 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com