लॉकडाउन एंटरटेन्मेंट ; सोशल मीडिया ठरले प्रभावी माध्यम 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

लॉकडाउन काळात सिनेमा थिएटर, नाट्यगृहे बंद राहिलीच. त्याशिवाय सर्वच सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंधने आली. मात्र, या काळात सोशल मीडिया मनोरंजनासाठी प्रभावी माध्यम ठरला.

कोल्हापूर :  लॉकडाउन काळात सिनेमा थिएटर, नाट्यगृहे बंद राहिलीच. त्याशिवाय सर्वच सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंधने आली. मात्र, या काळात सोशल मीडिया मनोरंजनासाठी प्रभावी माध्यम ठरला. त्या माध्यमातून घरबसल्या केवळ सिनेमाच नव्हे तर विविध क्षेत्रांतील नामवंतांशी गप्पा-गोष्टी आणि शास्त्रीय संगीतापासून ते गझलपर्यंत व बालगीतांपासून ते चित्रपट गीतांपर्यंत विविध गीतांच्या मैफलीची अनुभूती कोल्हापूरकरांना मिळाली. 

16 बालचित्रपट 
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनात महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक बालचित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत दाखवला जातो. लॉकडाउनमध्ये व्हॉटस्‌ ऍपच्या माध्यमातून हा उपक्रम झाला. एकूण आठ व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार झाले. या माध्यमातून दोन हजारांवर अधिक पालक व विद्यार्थी एकवटले. प्रत्येक बुधवारी व रविवारी त्या त्या दिवशीच्या चित्रपटांविषयी गोष्टीरूपात माहिती देणारा व्हिडिओ आणि त्यानंतर चित्रपटांच्या लिंक्‍स शेअर झाल्या. उद्या (बुधवारी) या उपक्रमांतर्गत सोळावा चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

नामवंतांशी गप्पा-गोष्टी... 
विरासत फाउंडेशनतर्फे लॉकडाउन काळात ऑनलाईन अभिनय स्पर्धा झाल्या. त्याशिवाय प्रत्येक रविवारी सिने, नाट्य व विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या मुलाखती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. मूळचे कोल्हापूरचे पण अजूनही कोल्हापूरकरांनाच माहिती नसलेल्या दिग्गजांच्या मुलाखती या उपक्रमातून घेण्यात आल्या. दीड हजारांवर लोक ऑनलाईन या उपक्रमात सहभागी होत असल्याचे प्रसाद जमदग्नी यांनी सांगितले. 

मुक्तरंग अन्‌ गावाकडची गाणी... 
येथील सोनी रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि अंतरंग वाद्यवृंदाच्या माध्यमातून सोनी मुक्तरंग ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. स्थानिक कलाकारांच्या गीत मैफलींचे फेसबुक लाईव्ह या उपक्रमांतर्गत सुरू आहे. प्रत्येक रविवारी हा उपक्रम राबवला जातो. साडेतीन हजारांहून अधिक रसिक यानिमित्ताने मैफलीचा आनंद घेत असल्याचे यशवंत वणिरे यांनी सांगितले. "गावशिवार' यूट्यूब चॅनेल गेली दीड वर्षे सुरू आहे. सुमारे पन्नास गावाकडच्या कविता व गाणी या चॅनेलवरून प्रसारित झाली. पण, लॉकडाउनच्या काळात वीसहून अधिक गाणी व कविता या चॅनेलवरून प्रसारित केल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे कवी गोविंद पाटील सांगतात. 

शास्त्रीय अन्‌ वेस्टर्न संगीत... 
प्रतिज्ञा नाट्यरंग व विविध संस्थांच्या माध्यमातून लॉकडाउन काळास तीसहून अधिक मैफलींचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घेता आला. सुरवातीच्या काळात घरातच गाण्यांचे व्हिडिओ शूट करून ते नंतर सोशल मीडियावर अपलोड केले गेले. मात्र, नंतरच्या काळात या मैफली फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू झाल्या आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला. या माध्यमातून गरजूंसाठी निधीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे 234 जणांना जीवनावश्‍यक साहित्याची किट देण्यात आली तर तीस जणांना आर्थिक साहाय्य देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Entertainment; Social media has become an effective medium