
गडहिंग्लज : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्याने, वाचनालये, चित्रपटगृहे, चहाच्या टपरींना कुलूप लागले आहे. नगरपालिकेच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली असून कोरोनाची धास्ती शहर आणि परिसरात कायम आहे. हळूहळू एकेक घटक बंदचा आदेश होत असल्याने जनजीवन मंदावले आहे. त्याचा बाजारपेठेवरही परिणाम जाणवत असून तहसीलदार दिनेश पारगे यांनी घरगुती कार्यक्रमांनाही पूर्वपरवानगी घ्यावी, असा आदेश काढला आहे.
गेल्या आठवडाभरापासून शहर आणि तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे. तालुक्यात कोरोनाची लक्षणे आणि उपाययोजना यासंदर्भात चारशेहून अधिक ठिकाणी डिजिटल फलक लावून जनजागृती केली आहे. परदेशाहून आलेल्या तिघांची आरोग्य विभाग रोज सकाळी आणि सायंकाळी तपासणी करीत आहे. पुणे, मुंबईहून आपल्या गावी आलेल्या नागरिकांना गावातील पोलिसपाटील, नगरपालिका, ग्रामपंचायतीत आपली माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी गांभीर्याने या सूचना पाळाव्यात, अशी सूचनाही केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. त्या आदेशाचा संदर्भ घेत तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा तहसीलदार दिनेश पारगे यांनी तालुक्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, मोर्चा, क्रीडा स्पर्धांवर बंदी आणली आहे.
जत्रा, उरूसमध्ये पुजारी किंवा धर्मगुरूंना विधिवत पूजा करण्यास व परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी दिली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना पूर्णत: बंदी असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घरगुती कार्यक्रमांना मात्र परवानगीला बंधनकारक केले आहे; परंतु या दोन्हींबाबत वैद्यकीय सुरक्षा पाळणे बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागासाठी तहसीलदार, तर शहरात मुख्याधिकारी यांची परवानगी घेणे सक्तीचे केले आहे.
दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी शहरातील उद्याने आणि साने गुरूजी वाचनालय आजपासून बंद करण्याचे आदेश दिले असून त्याची अंमलबजावणीही झाली आहे. तसेच पालिकेच्या आवारातील चहाच्या टपऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत.
हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. वेटर्सना हॅण्डग्लोव्हज, मास्क, डोक्यावर टोपी घालणे बंधनकारक केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. एसटी आगारातील बसेससह बसस्थानक परिसरही पाण्याने धुवून काढून पालिकेतर्फे औषध फवारणी केली आहे. शहरातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणी पालिकेतर्फे औषध फवारणी करून शहरातील अधिकाधिक भाग निर्जंतुक करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट...
दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तेथील विलगीकरण वॉर्डची पाहणी करून काही सूचना दिल्या. वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी वॉर्डसह केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. क्वारंटाईन व्यक्तींसाठी शहर आणि तालुक्यात 50 बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन असून त्याच्या कार्यवाहीसाठी प्रांताधिकाऱ्यांना सूचना दिल्या. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, शेंद्री रोडवरील समाजकल्याण वसतिगृहात क्वारंटाईन व्यक्तींसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात येणार आहे. तालुक्यात एकही कोरोनाग्रस्त नसला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे सारे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे यांनी शहरासह तालुक्यात राबवलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत माहिती दिली.
--------------------
घर टू घर होणार सर्व्हे
नगरपालिकेने शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्याचे नियोजन केले आहे. नगरपालिका शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीसांकडून हा सर्व्हे होणार असून यामध्ये पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणांहून आलेल्या नागरिकांची माहिती घेणे, घरात कोणी आजारी आहे का याची विचारपूस करण्यात येणार आहे. रोजच्या रोज त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी सांगितले.
--------------------
एकही रुग्ण नाही
शहरासह तालुक्यात एकही संशयित अगर कोरोनग्रस्त रुग्ण सापडलेला नाही. तसेच परदेशासह पुणे-मुंबईहून आलेल्यांपैकी एकही जण उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेला नाही. आयसोलेशन वॉर्डमध्येही रुग्ण नाही. विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:च्या पातळीवर दक्षता घेण्याचे आवाहन डॉ. डी. एस. आंबोळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.