बुकिंग होताहेत रद्द, मूर्तिकारांना बसतोय लाखोचा फटका...वाचा काय आहे बातमी

दिनकर पाटील
Friday, 24 July 2020

मूर्तिकारांकडून वर्षभर उंचीचे गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तिकारांनी चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्ती आधीच तयार केल्या आहेत.

नेसरी : आगामी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली साजरा होणार यात शंका नाही. शासनाने चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे गेल्या वर्षभरापासून तयार केलेल्या चार फुटावरील मूर्ती शेडमध्येच शिल्लक राहणार आहेत. यामुळे मूर्तिकारांना लाखोंचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे पन्नास वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. येथे दरवर्षी तीन हजारहून अधिक गणेशमूर्ती तयार केल्या जातात, मात्र कमी उंचीच्या मूर्तीच्या निर्णयामुळे लाखोचा फटका बसणार आहे.

मूर्तिकारांकडून वर्षभर उंचीचे गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तिकारांनी चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्ती आधीच तयार केल्या आहेत. परंतु, आता शासनाने चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करू नये, असा आदेश दिला आहे. त्यातच समाज हिताच्या दृष्टीने एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवण्याकडे गावांचा कल वाढत आहे.

परिणामी, दोन-चार महिने आधी मूर्तींचे केलेले बुकिंग आता मंडळे रद्द करत आहेत. यामुळे चार फुटापेक्षा मोठ्या गणेशमूर्ती शेडमध्येच शिल्लक राहणार आहेत. घरगुती गणेश मूर्तींच्या मागणीत कोणताच फरक पडलेला नाही. मोठ्या मूर्तींचे बुकिंग मात्र रद्द होऊ लागल्याने लाखो रुपयांचा फटका मूर्तिकारांना सोसण्याची वेळ येणार आहे. लॉकडाउनमुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रंगाचे वाढलेले दर, अपुरी कारागीर संख्या अशा अनेक समस्यांच्या कचाट्यात मूर्तिकार अडकला आहे. बाहेरून गणेशमूर्ती, रंग साहित्य खरेदी करताना अडचणी येत आहेत. 

हेळेवाडी येथे पन्नास वर्षांपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. कै. जानबा सुतार यांनी मूर्ती तयार करण्याची परंपरा जोपासली होती. आता त्यांची मुले केशव, नारायण व नातू प्रवीण, शशिकांत यांनी ही परंपरा जोपासत आहेत. तिसरी पिढी या मूर्तीकामात व्यस्त आहे. जवळपास 25 लाखांची उलाढाल होते. कर्नाटक, गोवा राज्यासह आजरा, चंदगड तालुक्‍यातून मूर्तीना मागणी असते. परंतु, यंदा लॉकडाउनमुळे मूर्तींचा पुरवठा कसा करायचा, हा प्रश्‍न आहे. यंदा किमान 10 लाखांचा फटका बसण्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली. 

चार फुटावरील गणेशमूर्ती शेडमध्ये शिल्लक
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढल्याने अनेक मंडळांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवणार आहेत. बुकिंग केलेल्या गणेशमूर्ती रद्द केले जात आहेत. काही मंडळांनी मूर्तीची अर्धी किंमत देण्याची तयारी दर्शविली आहे. चार फुटावरील गणेशमूर्ती शेडमध्ये शिल्लक आहेत. याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 
- केशव सुतार, गणेशमूर्तिकार, हेळेवाडी ता. गडहिंग्लज

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Losses Of Ganesha Sculptors Kolhapur Marathi News